छत्तीसगड; नक्षली हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ८ जवान शहीद


सुकमा – नक्षलवाद्यांनी छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात घडवलेल्या आयईडी स्फोटात ८ जवान शहीद झाले असून सहा जवान या स्फोटात जखमी झाले असून यातील चार जणांची प्रकृती गंभीर आहे.

केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या २१२ व्या बटालयनचे जवान सुकमा जिल्ह्यातील किस्तराम परिसरातून जात होते. नक्षलवाद्यांनी यादरम्यान आयईडीद्वारे स्फोट घडवला. या स्फोटात आठ जवान घटनास्थळीच शहीद झाले. तर सहा जवान गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच सुरक्षा दलांचे पथक घटनास्थळी रवाना झाले आहे.

२ मार्च रोजी सुरक्षा दलांनी तेलंगणा सीमेवर छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात माओवाद्यांवर कारवाई केली होती. या चकमकीत १० माओवादी ठार झाले. तर एक जवान शहीद झाला होता. गुप्तचर यंत्रणांना माओवाद्यांच्या कॅम्पवर त्यांचे मोठे नेते असल्याची माहिती मिळाली होती. सुरक्षा दलांनी यानंतर पुजारीकंकर जंगलात घुसून कारवाई करत माओवाद्यांना दणका दिला होता. माओवाद्यांनी या कारवाईचा बदला घेण्यासाठी जगदलपूरवरुन हैदराबादकडे जाणाऱ्या महामार्गावरही गेल्या आठवड्यात धुमाकूळ घातला होता. तेलंगणा परिवहन मंडळाच्या तीन बसेस जाळण्यात आल्या होत्या. या बसमध्ये प्रवास करणाऱ्या एका निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचीही माओवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. या पाठोपाठ सुकमा येथेही हल्ला करण्यात आला आहे.