उत्तर प्रदेशात तुरुंगात एचआयव्हीचा कहर, मंत्र्यांना चिंता


उत्तर प्रदेशातील तुरुंगांमध्ये एचआयव्हीची लागण झालेल्या कैद्यांची संख्या वाढत असून यामुळे संपूर्ण खात्यात हाहाकार उडाला आहे. अखेर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने राज्यातील विविध तुरुंगांमध्ये असलेल्या कैद्यांची रक्तचाचणी करण्याचे आदेश दिले आहेत.

शुक्रवारी गाझियाबाद जिल्ह्यातील दसना तुरुंगात 27 कैदी एचआयव्हीग्रस्त असल्याचे आढळले होते, तर मेरठ येथील तुरुंगात 10 कैदी एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळले. गेल्या महिन्यात गोरखपूर तुरुंगात 10 कैदी एचआयव्हीग्रस्त असल्याचे आढळले होते.

यामुळे अनेक कैद्यांनी आपले कुटुंबीय व वकिलांशी संपर्क साधून वैद्यकीय आधारावर जामीन अर्ज दाखल करण्यास सांगितले आहे. अन्यथा तुरुंगात आपल्या आरोग्याला धोका असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. दुसरीकडे राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने राज्य सरकारला नोटिस बजावली असून सहा आठवड्यांत उत्तर देण्यास सांगितले आहे.

एचआयव्हीच्या संसर्गाबद्दल आपण चिंताग्रस्त असल्याचे उत्तर प्रदेशचे तुरुंग खात्याचे मंत्री जयकुमार जॅकी यांनी शनिवारी सांगितले. “कैद्यांना तुरुंगात आणण्यात येते तेव्हा त्यांची सविस्तर वैद्यकीय चाचणी करण्याची कोणतीही व्यवस्था नाही. त्यांची सामान्य वैद्यकीय चाचणी करण्यात येते आणि त्यात केवळ जखमा, रक्तदाब इत्यादीवरच भर देण्यात येतो. तुरुंगात येतानाच काही जण एचआयव्हीचा संसर्ग घेऊन येतात का, हे माहीत नाही,” असे ते म्हणाले.