गांधी कुटुंबीयांवर सुब्रमण्यम स्वामींचा खळबळजनक आरोप


नवी दिल्ली – गांधी कुटुंबीयांवर भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी खळबळजनक आरोप केला असून त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांना माफ करण्याच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.

सुपारी देऊन राजीव गांधी यांची हत्या करण्यात आली असेल, याचा तपास केला पाहिजे, अशी मागणी करत स्वामींनी थेट सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. सोनिया गांधींनाच राजीव गांधी यांच्या हत्येचा सर्वाधिक फायदा झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.

नलिनीला सर्वोच्च न्यायालयाने मृत्यूदंड ठोठावला होता. राष्ट्रपतींना पत्र लिहून तिला आजीवन कारावास देण्याची मागणी त्यांनी (गांधी कुटुंब) केली. त्यामुळे आता राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरून संपूर्ण कुटुंबावर संशय येतो. सोनिया गांधींना राजीव गांधी यांच्या हत्येचा सर्वाधिक फायदा झाला होता, असा खळबळजनक आरोप त्यांनी केला.

ते म्हणाले, सर्वोच्च न्यायालय जेव्हा यावर विचार करत असेल आणि भारत सरकारने सक्त भूमिका घेतली असेल नेमके त्याचवेळी असे वक्तव्य करणे याचाच अर्थ त्यांचा एलटीटीईशी काही संबंध असू शकतो. कदाचित राजीव गांधी यांच्या हत्येसाठी सुपारी दिली असेल. याचा तपास केला पाहिजे. राजीव गांधी काय त्यांची ‘प्रॉपर्टी’ आहे का, असा सवाल करत ते देशाचे पंतप्रधान असल्यामुळेच त्यांची हत्या झाली.

स्वामींनी प्रियंका गांधींनी वडिलांच्या मारेकऱ्यांच्या घेतलेल्या भेटीवरही टीका केली. फक्त नातेवाईकांना तुरूंगात कैद्याशी भेटू दिले जाते. त्या कोणत्या नातेवाईक आहेत ? नलिनीच्या मुलीचा इंग्लंडमधील शिक्षणाचा सर्व खर्च उचलला सोनिया गांधींनी आहे. एवढी दया त्यांच्यावर का दाखवली जात आहे ?