प्राण्यांनी असा उगविला माणसांवर सूड


माणसाने जनावरांना इजा पोहोचविली असताना प्राण्यांनी फिरून माणसांवर सूड उगविल्याच्या आश्चर्यचकित करणाऱ्या घटना घडून गेल्या आहेत. या घटना लक्षात घेता प्राणी देखील सूडबुद्धीने वागू शकतात हे पटते. १९९७ साली रशियामध्ये एका शिकाऱ्याने शिकार करण्याच्या उद्देशाने वाघाला जखमी केले खरे, पण वाघाची शिकार करण्यात तो अयशस्वी ठरला. हे प्रकरण तेवढ्यावरच संपले नाही. त्या वाघाने शिकाऱ्याची जंगलामध्ये असलेली केबिन शोधून काढली. वाघ केबिनपाशी पोहोचला तेव्हा शिकारी तिथे नव्हता. वाघाने तब्बल बारा तास त्या शिकाऱ्याची वाट पहिली. शिकारी बेसावध होता, आणि आपल्यापुढे कोणते संकट वाढून ठेवले आहे याची त्याला काहीच कल्पना नव्हती. शिकारी केबिनपाशी पोहोचता क्षणीच वाघाने त्याची शिकार केली.

२००१ साली टेक्सास मध्ये एका व्यक्तीचा त्याच्याच घरामध्ये निर्घृण खून करण्यात आला. या व्यक्तीच्या पाळीव काकाकुवाने मारेकऱ्यावर आपल्या तीक्ष्ण चोचीने हल्ला चढविला. मारेकरी पळून गेला, पण त्याच्या चोचीवर लागलेल्या त्याच्या रक्तातून पोलिसांना डीएनए मिळविण्यात यश आले. ह्या डीएनए वरून पोलिसांनी मारेकऱ्याला पकडले. २०११ साली एका शिकाऱ्याने कोल्ह्याला गोळी मारली. कोल्हा जखमी होऊन जमिनीवर पडला. त्याला मारून टाकण्याच्या उद्देशाने शिकारी कोल्हयाजवळ गेला, त्याक्षणी कोल्ह्याने त्याच्यावर झेप घेतली, झटापट सुरु झाली आणि कोल्ह्याचा पंजा बंदुकीच्या चापामध्ये अडकून चाप ओढला गेला, आणि गोळी शिकाऱ्याला लागली.

१८५९ साली ऑस्ट्रेलियामधील एका धनाढ्य व्यक्तीने आपल्या शेतामध्ये काही ससे आणून सोडले. मनाला येईल तेव्हा या सशांची शिकार करता येईल हा त्यामागील उद्देश होता. पण कालांतराने सशांची संख्या झपाट्याने वाढू लागली. सशांनी शेतांचे नुकसान करण्यास सुरुवात केली. काही काळाने सशांची संख्या इतकी वाढली, की त्यामुळे केवळ त्या धनिकाच्या शेताचेच नाही, तर आसपासच्या शेतांचे देखील प्रचंड नुकसान सशांनी केले. आज देखील ऑस्ट्रेलियाच्या त्या विशिष्ट प्रांतामध्ये सशांच्या उपद्रवामुळे दर वर्षी लाखो डॉलर्सचे नुकसान होत असते.

२०१५ साली चीनमध्ये घडलेली ही घटना अतिशय विचित्र आहे. चॉन्गक्विंग नामक एका ठिकाणी एका व्यक्तीने त्याच्या गाडी लावण्याच्या पार्किंग प्लेस मध्ये एक कुत्रे निजलेले पहिले. त्या माणसाने कुत्र्याला तिथून हाकलण्याच्या उद्देशाने गाडीमधून उतरून कुत्र्याला लाथेने तुडविले. कुत्रे निमुटपणे उठून निघून गेले. पण त्यानंतर ते कुत्रे तिथे परतले ते आणखी काही कुत्र्यांना घेऊनच. त्या सर्व कुत्र्यांनी त्या माणसाची गाडी चावून चावून पार वाकवून टाकली. त्या माणसाच्या शेजाऱ्याने हा प्रकार पहिला आणि त्याने या घटनेची छायाचित्रे टिपली. केवळ छायाचित्रे होती म्हणूनच झाल्या प्रकारावर सर्वांचा विश्वास बसला. अन्यथा ही घटना कोणाला खरी वाटली नसती.

Leave a Comment