या मालकाने घातले चक्क आपल्या पाळीव पोपटाचे श्राद्ध


पाटणा: नातेवाईक आपल्या प्रिय व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या स्मृतीप्रीत्यर्थ अनेक गोष्टी करतात. कोणत्याही संबंधित व्यक्तीच्या इच्छा-आकांक्षा अतृप्त राहू नयेत, त्याचा परलोकातील प्रवास सुकर व्हावा, त्याचे श्राद्ध आणि इतर सोपस्कारही या भावनेने केले जातात. पण नुकतेच उत्तर प्रदेशमध्ये घालण्यात आलेले श्राद्ध सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. हे श्राद्ध कुणा मनुष्याचे नाही तर एका पोपटाचे होते.

रविवारी श्राद्धाचा हा कार्यक्रम येथील अमरोहच्या हसनपूर परिसरात पार पडला. पंकज कुमार यांच्या पाळीव पोपटाचे हे श्राद्ध होते. पंकज कुमार यांच्याकडील पोपटाचा ५ मार्च रोजी मृत्यू झाला होता. पंकज कुमार यांनी हा पोपट पाच वर्षांपूर्वी घरी आणला होता. त्याला पायाला दुखापत झाल्यामुळे उडता येत नव्हते. हा पोपट तेव्हापासून पंकज कुमार यांच्याकडे होता. आम्ही अखेरच्या दिवसांमध्ये त्याला वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले. आम्ही त्याची माझ्या मुलापेक्षा जास्त काळजी घेत होतो, असे पंकज कुमार यांनी सांगितले.

पंकज कुमार यांना हा पोपट खूप प्रिय असल्याने त्यांनी एखाद्या घरातल्या व्यक्तीप्रमाणे त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. एवढेच नव्हे काल हसनपूर येथे पोपटाचा श्राद्धविधी पार पडला. यावेळी पारंपारिक हिंदू पद्धतींनुसार हवन करण्यात आले. तसेच लोकांना भोजनही देण्यात आले.