ह्या विदेशी हनिमून डेस्टीनेशन्स करिता व्हिसाची आवश्यकता नाही


आजकाल विवाहानंतर मधुचंद्रासाठी किंवा सुट्ट्यांमध्ये भटकंतीला जाण्यासाठी परदेशी जाण्याला लोक अधिक पसंती देताना दिसू लागले आहेत. परदेशी जाण्यासाठी सर्व औपचारिक प्रक्रिया पूर्ण करताना क्वचित व्हिसा मिळण्यास अडचण येऊ शकते. असे झाले तर भटकंतीचा पूर्ण कार्यक्रम रद्द करावा लागतो आणि सर्वांच्याच उत्साहावर विरजण पडते. पण काही विदेशी ठिकाणे अशीही आहेत, जिथे जाण्यासाठी तुम्हाला आधीपासून व्हिसा घेण्याची आवश्यकता नाही.

पांढरी शुभ्र रेती, सुंदर समुद्रकिनारे, निळ्याशार पाण्याचे जलाशय, समुद्रकिनारी असलेले वॉटर व्हिलाज, ही सर्व आकर्षणे आहेत मालदीव्हज येथे. म्हणूनच नवविवाहित दाम्पत्यांची पसंती या ठिकाणाला अधिकाधिक मिळत आहे. येथे येण्याकरिता तुम्हाला आधीपासून व्हिसा घेण्याची आवश्यकता नाही. येथे आल्यानंतर तुम्हाला ९० दिवसांचा व्हिसा मोफत दिला जातो. वर्षभरामध्ये कोणत्याही महिन्यामध्ये तुम्ही येथे जाऊ शकता. माले, ल्हावियानी, काफू, आडू सिटी ही येथील प्रमुख पर्यटनस्थळे आहेत.

सेशेल्स येथे जाण्यासाठी देखील आधीपासून व्हिसाची आवश्यकता नाही. येथे आल्यानंतर तीस दिवसांचा व्हिसा तुम्हाला दिला जातो. येथे देखील वर्षातील कोणत्याही महिन्यांमध्ये तुम्ही येऊ शकता. माहे, प्रास्लीन, व्हिक्टोरिया, ला डीग, डेनिस, फ्रिगेट ही ठिकाणे येथील प्रमुख आकर्षणे आहेत. ‘ देवांचे बेट ‘ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बाली या देशामध्ये देखील तीस दिवसांचा व्हिसा, तिथे पोहोचल्यानंतर दिला जातो. सुंदर सागरी किनारे आणि अप्रतिम निसर्ग सौंदर्याने नटलेला हा देश पर्यटकांसाठी मोठे आकर्षण ठरत आहे. बाली ला तुम्ही वर्षभरामध्ये कधीही भेट देऊ शकता. बाली, जकार्ता, जावा, सुमात्रा ही बेटे येथील प्रमुख पर्यटनस्थळे आहेत.

मॉरीशस या देशामध्ये तुम्हाला साठ दिवसांचा व्हिसा येथे पोहोचल्यावर देण्यात येतो. अनेक रेन फॉरेस्ट्स, पाण्याचे प्रचंड धबधबे, अभयारण्ये यांनी नटलेले हे ठिकाण आहे. एप्रिल ते जून आणि सप्टेंबर ते डिसेंबर हे महिने येथे जाण्यासाठी चांगले. येथील तामारीन रिव्हियेरा, फ्लिक न् फ्लॅक, रॉड्रिग्ज इत्यादी ठिकाणे प्रसिद्ध आहेत. तसेच थायलंडला जाण्यासाठी देखील आधीपासून व्हिसा घेण्याची आवश्यकता नाही. येथे पोहोचल्यानंतर १००० बात ( साधारण २००० रुपये ) भरून तुम्हाला तीस दिवसांसाठी व्हिसा मिळतो. थायलंड येथे अनेक ऐतिहासिक ठिकाणे, सुंदर समुद्रकिनारे आहेत. येथे वॉटर स्पोर्ट्सचा आनंद तुम्ही घेऊ शकता. नोव्हेंबर पासून फेब्रुवारी पर्यंतचा काळ थायलंडला जाण्यासाठी चांगला. येथे फिफी, फुकेट, कोह समुई, क्राबी आयलंड्स, चीयांग माई ही ठिकाणे प्रेक्षणीय आहेत.

Leave a Comment