काही घरगुती औषधोपचार


आपल्या शरीरामध्ये उद्भविणाऱ्या प्रत्येक लहान सहान आजारासाठी औषधे घेणे योग्य नाही. कारण त्या औषधांनी गुण येत असला, तरी माफक प्रमाणामध्ये त्यांमधील रसायनांचे दुष्परिणाम आपल्या शरीरावर होतच असतात. त्याउलट अश्या अनेक वस्तू आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध असतात, ज्यांच्या सेवानाने लहान सहान आजार बरे होऊ शकतात, आणि त्याचे कोणत्याही प्रकारचे साईड इफेक्ट्स आढळून येत नाहीत. अश्याच काही घरगुती उपचारांविषयी माहिती माझा पेपरच्या वाचकांसाठी.

सकाळी उठून रिकाम्या पोटी सफरचंदाचे सेवन केल्याने मायग्रेन मुळे उद्भविणारी डोकेदुखी कमी होते. ज्यांना मायग्रेनचा त्रास असेल, त्यांनी हा उपाय सलग काही दिवस करावा.

सहा खजूर अर्धा लिटर दुधामध्ये साधारण पंधरा ते वीस मिनिटे उकळून घ्यावे. हे दुध अगदी बारीक आचेवर उकळू द्यावे. ह्या खजूर घालून उकळलेल्या दुधाचे सेवन दिवसातून तीन वेळा करावे. ज्यांना कोरडा खोकला वारंवार येत असतो, त्यांच्यासाठी हा उपाय अत्यंत फायदेशीर ठरेल.

ज्यांना वारंवार अपचन किंवा बद्धकोष्ठाचा त्रास होतो, त्यांनी सकाळी उठून उकडलेल्या बीटाचे एक कपभर तुकडे खावेत. हे बीटाचे तुकडे सकाळी उठून, इतर काही खाण्या- पिण्याआधी किंवा सकाळच्या नाश्त्याच्या आधी खायचे आहेत.

ज्यांना वारंवार अॅसिडीटीचा त्रास होतो, त्यांनी जेवल्यानंतर तुळशीची पाने धुवून मग ती सावकाश चावून खावीत. तुळस हे एक प्रभावी अँटॅसिड असून, ह्याच्या सेवनाने अन्नाचे पचन व्यवस्थित होतेच, त्याशिवाय ‘अॅसिड रीफ्लक्स’, म्हणजेच अन्न घशाशी येणे किंवा अल्सर्स होत नाहीत.

थंड दुध, केळे आणि मध एकत्र करून मिक्सरवरून फिरवून घेऊन त्याचा मिल्क शेक तयार करून घ्यावा. ह्या मिल्क शेकच्या सेवनाने पोटाच्या अस्तराला ( stomach lining )आराम मिळून, मधामुळे शरीरामध्ये कमी झालेल्या शुगर लेव्हल्स पुन्हा वाढण्यास मदत मिळते. मद्यपान केल्यानंतर काही काळानंतर उद्भविलेला ‘हँग ओव्हर’ घालविण्यासाठी हा उपाय फायदेशीर ठरतो.

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जर भर दुपारी उन्हामध्ये हिंडणे झाले, तर काही काळाने त्यामुळे डोके दुखू लागते. अश्या वेळी कलिंगडाचा रस घेतल्याने डोकेदुखी कमी होण्यास मदत होते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये दररोज एक ग्लास कलिंगडाचा रस प्यायल्याने उन्हामध्ये हिंडल्याने डोकेदुखी उद्भवत नाही.

टोमॅटो चा गर हा, डोळ्यांच्या भोवतीची काळी वर्तुळे घालविण्यास सहायक आहे. ही पेस्ट बनविण्याकरिता दोन ताजे टोमॅटो, एक मोठा चमचा लिंबाचा रस, एक चिमुटभर बेसन, आणि एक चिमुटभर हळद असे सर्व मिक्सरवर बारीक वाटून घ्यावे. ही पेस्ट डोळ्यांच्या भोवती हळुवार हाताने लावून घ्यावी. ही पेस्ट साधारण वीस मिनिटे राहू देऊन त्यानंतर चेहरा पाण्याने स्वछ धुवावा.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment