विदेशी भाषा शिकणे उन्हाळ्याच्या सुट्टीतील पसंतीचा पर्याय


आजच्या नवतरुण पिढीला, तुम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये काय करणार असा प्रश्न केला की उत्तरादाखल अनेक पर्याय समोर येतात. कोणी मित्रमंडळींसोबत भ्रमंतीला जाणार असते, तर कोणी काही शैक्षणिक कोर्स करणार असते. पण बहुतेक तरुणाईची पसंती, विदेशी भाषा शिकण्याला मिळत असल्याचे दिसून आले आहे. आजकाल पर्यटनक्षेत्रामध्ये उपलब्ध असणाऱ्या अनेक संधी, किंवा परदेशी उच्च शिक्षणासाठी किंवा नोकरीनिमित्त जाण्याच्या संधी उपलब्ध असल्याने विदेशी भाषा शिकण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. तर काही विद्यार्थी केवळ नवनवीन भाषा शिकण्याची, आणि त्याद्वारे त्या-त्या देशांची संस्कृती जाणून घेण्याची जिज्ञासा असल्यामुळे विदेशी भाषा शिकण्यास प्राधान्य देत असल्याचे आढळून आले आहे.

निरनिराळ्या विदेशी भाषा शिकण्यासाठी अनेक भाषा संस्था जवळजवळ सर्व मोठ्या शहरांमध्ये अस्तित्वात आहेत. ह्या भाषा संस्था खास सुट्टीच्या काळामध्ये विद्यार्थ्यांसाठी लँग्वेज कोर्सेसचे आयोजन करीत असल्याने शाळा कॉलेज सांभाळून हे कोर्सेस करणे विद्यार्थ्यांना शक्य होत आहे. तसेच प्रत्येक लँग्वेज कोर्स केल्यानंतर तसे प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना दिले जात असल्याने त्यांच्यासाठी हे एक अतिरिक्त क्वालीफिकेशन आहे असे म्हणावे लागेल. म्हणूनच उन्हाळ्याच्या सुट्ट्या तश्याच घालविण्यापेक्षा एखादी भाषा शिकायची पर्वणी मुलांना मिळाली, तर तिचा उपयोग करून घेण्यास आताची तरुणाई प्राधान्य देत आहे.

तसेच विदेशी भाषा शिकण्यासाठी जरी कोणतीही भाषासंस्था उपलब्ध नसली, तरी अनेक भाषा संस्थांतर्फे फॉरीन लँग्वेज कोर्सेस ऑनलाईन देखील चालविले जातात. त्यामुळे जी भाषा शिकायची असेल त्या भाषेचे ऑनलाईन प्रशिषण घेता येते. सध्या जास्त चलनात असणाऱ्या भाषा कोणत्या आहेत हे ठरवून त्यानुसार भाषेची निवड करून प्रशिक्षण घेता येऊ शकते. ज्या परदेशी कंपन्या इथे व्यवसायानिमित्त गुंतवणूक करीत आहेत, त्या कंपन्यांमध्ये नोकरी मिळण्याच्या दृष्टीने देखील परदेशी भाषा शिकण्याचे महत्व असून, तसा पर्याय हमखास निवडण्याकडे आजच्या तरुण पिढीचा कल दिसून येत आहे.

Leave a Comment