सुरक्षित भविष्याकरिता करा पैशांची बचत, म्हणतात सुधा मूर्ती


आपल्याकडे पैशांची कमतरता कधीही असू नये अशी आपल्या प्रत्येकाचीच इच्छा असते. किंबहुना नोकरीला लागल्यापासून किंवा स्वतःचा व्हावासाय सुरु करताना आपली हीच इच्छा असते. आपण कमावत असलेला पैसा आयुष्यभर वाढत राहावा आणि आयुष्य सुखासमाधानाचे जावे असेच प्रत्येकाचे ध्येय असते. पण ही इच्छा प्रत्यक्षात उतरवायची असेल, तर त्यादृष्टीने जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवेत असे सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या, लेखिका आणि इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्षा श्रीमती सुधा मूर्ती म्हणतात.

दूरदृष्टी, अपार मेहनत आणि योग्य आर्थिक नियमन ही आपल्या यशाची गुरुकिल्ली असल्याचे श्रीमती मूर्ती म्हणतात. जसजसे आपले वय वाढत जाते तसतश्या जबाबदाऱ्याही वाढत असतात. आणि म्हणूनच आपण आपल्या पैशांचे योग्य प्लॅनिंग करणे आवश्यक असल्याचे श्रीमती मूर्ती म्हणतात. मुलांचे शिक्षण, स्वतःचे मालकीचे घर, आणि वृद्धत्वासाठी पैसे वाचविणे आवश्यक आहे. म्हातारपणी देखील पैशांच्या बाबतीत कोणावरही अवलंबून राहण्याची वेळ येऊ नये इतपत आर्थिक तरतूद प्रत्येकाने स्वतःपुरती करायला हवी असा सल्ला श्रीमती मूर्ती देतात.

आयुष्यामध्ये कोणतीही गोष्ट गृहीत न धरता, प्रत्येक वस्तूचे मोल समजून घेणे आणि मुलांना ते समजावून सांगणे महत्वाचे असल्याचे श्रीमती मूर्ती म्हणतात. कोणतीही वस्तू मुलांना देताना ती वस्तू व्यवस्थित वापरण्याबद्दल शिकवण देणे ही पालकांची जबाबदारी असते. त्याचप्रमाणे केवळ पैसे आहेत म्हणून वस्तू खरेदी करीत राहणे म्हणजे पैश्याचा अपव्यय आहे असे श्रीमती मूर्ती म्हणतात.

एखादी वस्तू घेताना विचारपूर्वक घ्यायला हवी. आपल्याला त्या वस्तूची खरोखरच गरज आहे का, की इतरांच्या देखादेखी आपण ती वस्तू घेतो आहे याचा विचार प्रत्येकाने प्रामाणिकपणे करावा. जर वस्तूची गरज नाही असे जाणविले तर त्यामध्ये पैसे घालवू नयेत. मात्र त्या वस्तूची खरोखरच गरज असेल, तर मात्र ती वस्तू अवश्य खरेदी करावी असे मत श्रीमती मूर्ती यांनी मांडले. त्याचबरोबर भविष्यामध्ये अकस्मात उद्भविलेल्या अडी-अडचणींचे निवारण करण्यासाठी देखील आर्थिक तरतूद वेळीच करून ठेवणे गरजेचे असल्याचे श्रीमती मूर्ती म्हणतात.

Leave a Comment