कन्जन्क्टीव्हायटीस ( डोळे येणे ) पासून असा करा आपला बचाव


बदलत्या हवामानामुळे सर्दी खोकला होणे, व्हायरल इन्फेक्शनमुळे ताप येणे, पोट बिघडणे अश्या तक्रारी सामान्यपणे उद्भविताना दिसतात. त्याचसोबत आणखी एक समस्या झपाट्याने पसरताना दिसते, ती म्हणजे डोळ्याचे इन्फेक्शन, ज्याला आपण सर्वसाधारणपणे डोळे येणे असे म्हणतो. साधारणपणे हवामान बदलत असतान डोळे येण्याची साथ येते. आपल्या आसपासच्या कोणाला डोळे आले असले, की जवळपास सर्वांनाच डोळे येण्याचा धोका उद्भवतो. ह्या इन्फेक्शनमुळे डोळे लाल होणे, दुखणे, डोळ्यांतून पाणी येणे, डोळ्यांतून चिकट स्राव येणे अश्या प्रकारच्या तक्रारी उद्भवतात.

डोळे अनेक कारणांमुळे येऊ शकतात. आपण नव्याने वापरत असलेल्या शँपूची अॅलर्जी, डोळ्यांमध्ये धुळीचे कण जाणे, प्रदूषण, हवामानातील बदलामुळे झालेले इन्फेक्शन, किंवा डोळ्यांच्या संपर्कात क्लोरीन आल्याने देखील डोळे येऊ शकतात. ह्याशिवाय व्हायरल किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे देखील डोळे येऊ शकतात. तसेच अनेकदा आपण वापरत असलेल्या कॉन्टॅक्ट लेन्सेस इंफेक्ट झाल्याने ते इन्फेक्शन डोळ्यांमध्ये येऊन डोळे येऊ शकतात. कारण कोणतेही असो, डोळे येण्यामुळे होणारे त्रास आपल्याला सहन करावे लागतात. त्यामुळे डोळे येऊ नयेत, किंवा डोळ्यांमध्ये कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन होऊ नये यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.

आपण काम करीत असताना अनेकदा आपला हात आपल्या डोळ्याकडे जात असतो. आपल्या हाताला लागेलेल्या वस्तूंमधील किटाणू डोळ्यांमध्ये शिरून डोळ्यांमध्ये इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. त्यामुळे हातातील काम संपल्यानंतर हात त्वरित धुवावेत. दिवसातून किमान पाच ते सहा वेळा साबणाने आणि पाण्याने हात स्वछ धुवावेत. आपले आय ड्रॉप्स, आय लायनर, लेन्सेस, पण वापरलेला टिश्यू पेपर, टॉवेल इतरांना वापरण्यास देऊ नये, तसेच इतरांनी वापरलेल्या अश्या प्रकारच्या वस्तू आपणही वापरू नये.

डोळे आलेले असताना आपल्या डोळ्यांचा बाहेरील प्रदूषणापासून बचाव करणे अतिशय आवश्यक आहे. त्यासाठी बाहेर पडताना डोळ्यांवर सन ग्लासेस असावेत. तसेच वारंवार डोळ्यांना हात लावणे किंवा डोळे चोळणे टाळावे. आपला टॉवेल आणि आपण वापरत असलेल्या उशीचा अभ्रा नियमितपणे बदलत राहावे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment