असा करा सुंदर चेहऱ्यासाठी ग्लिसरीनचा वापर


ग्लिसरीनचा वापर सुंदर त्वचेसाठी करण्याची पद्धत फार पुरातन काळापासून अस्तित्वामध्ये आहे. आज बाजारामध्ये उपलब्ध असलेली अनेक सौंदर्यप्रसाधने अस्तित्वात येण्यापूर्वीच्या काळापासून ग्लिसरीनचा उपयोग त्वचेच्या सौंदर्यासाठी केला जात आला आहे. इतकी सारी सौंदर्यप्रसाधने बाजारामध्ये उपलब्ध असताना देखील आजच्या काळामध्येही ग्लिसरीनचा उपयोग त्वचेचे सौंदर्य जपण्यासाठी केला जातो.

ग्लिसरीनला ग्लिसेरोल म्हणूनही ओळखले जाते. हा पदार्थ तरल असून, याला कोणताही रंग नाही. ग्लिसरीन चवीला काहीसे गोडसर असून फार पातळ नसते. ग्लिसरीन हे साखर आणि अल्कोहोलचे organic compound आहे. ग्लिसरीन हे वनस्पतींपासून किंवा प्राण्यांपासून मिळविले जाते. सौंदर्यप्रसाधने आणि फार्मास्युटिकल्स मध्ये ग्लिसरीनचा उपयोग मोठ्या प्रमाणावर केला जातो. आपणही आपल्या त्वचेचे सौदर्य वाढविण्याकरिता अनेक प्रकारे ग्लिसरीन चा उपयोग आपल्या चेहेऱ्यासाठी करू शकता.

चेहेऱ्यावरील त्वचा कोरडी पडत असल्यास तिला आर्द्रता देण्यासाठी ग्लीसरीनचा उपयोग करता येईल. यासाठी चेहरा पाण्याने धुवून घेऊन मग अलगद पुसावा. चेहरा पूर्ण कोरडा न करता थोडा ओलसर ठेवावा. त्यानंतर एका ओल्या कापसाच्या बोळ्यावर ग्लिसरीन घेऊन ते संपूर्ण चेहऱ्याला लावावे. ग्लिसरीन लावताना ते डोळ्यांमध्ये जाणार नाही याची काळजी घ्यावी. ग्लिसरीन चेहऱ्यावर काही वेळ तसेच राहू देऊन मग चेहरा पाण्याने धुवावा.

ग्लिसरीन एक उत्तम क्लेन्जर आहे. दिवसभर घराबाहेर राहिल्याने बाहेरील प्रदूषणाचे, धुळीचे कण चेहऱ्यावर असतात, तसेच आपण वापरत असलेली सौंदर्यप्रसाधने देखील असतातच, या सर्वांचा आपल्या त्वचेवर दुष्परिणाम होत असतो, हे टाळण्यासाठी त्वचेचे ‘ डीप क्लीनिंग ‘ करणे आवश्यक असते. या साठी तीन लहान चमचे दुधामध्ये एक लहान चमचा ग्लिसरीन घालावे आणि कापसाच्या बोळ्याने हे मिश्रण चेहेऱ्यावर रात्री झोपण्यापूर्वी लावावे. सकाळी उठल्यानंतर चेहरा पाण्याने धुवून घ्यावा.

चेहरा पाण्याने धुतल्यानंतर ग्लिसरीन चा वापर टोनर म्हणून देखील करता येतो. यासाठी दीड कप गुलाबजल आणि पाव कप ग्लिसरीन एकत्र करून बाटलीमध्ये भरून ठेवावे. दररोज सकाळी चेहरा धुतल्यानंतर हे टोनर वापरावे. याने त्वचेचा पोत सुधारण्यास मदत होते. बहुतेक जणांना ग्लिसरीनची अॅलर्जी येत नाही, पण काहींना ही अॅलर्जी येण्याची शकयता असते. त्यामुळे ग्लिसरीनचा वापर करण्यापूर्वी त्याची अॅलर्जी होत नसल्याची काळजी घ्यावी, तसेच ग्लिसरीन वापरताना नेहमी पाण्यामध्ये किंवा दुधामध्ये, अथवा गुलाबजलामध्ये मिसळून लावावे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही