सप्तशृंगीवर फ्युनिक्युलर ट्रॉलीने पोहोचता येणार ३ मिनिटात


नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध वणीच्या डोंगरावरील सप्तशृंगी माता मंदिरापर्यंत जाण्यासाठी देशातील पहिली व एकमेव फ्युनिक्युलर ट्रॉली लवकरच धावणार असून या ट्रॉलीच्या चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. यामुळे समुद्रसपाटीपासून सुमारे साडेचार हजार फुटांवर असलेल्या या मंदिरात भाविक तीन मिनिटात पोहोचू शकणार आहेत. एरव्ही हा ३३०फुट उंचीचा डोंगर चढण्यासाठी ५०० पायरया चढाव्या लागतात. वास्तविक हा प्रकल्प २०१० साली मंजूर झाला होता मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे त्याचे काम आत्ता पूर्ण झाले आहे. हे काम पूर्ण होण्यासाठी चार वर्षे लागली.

या ट्रॉलीसाठी ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना ४० रु. तर बाकी सर्वाना ८० रु. तिकीट आकारले जाणार आहे. या गडावर दररोज साधारण ५ हजार भाविक येतात. नव्या सोईमुळे एक तासात १२०० भाविक गडावर पोहोचू शकतील. एका वेळी ६० भाविक ट्रॉलीच्या सहाय्याने गडावर जाऊ शकणार आहेत. सुयोग गुरुबक्षी फ्युनिक्युलर रोपवेजचे अधिकारी राजीव लुम्बा म्हणाले या ट्रॉलीसाठी इटलीने तंत्रज्ञान पुरविले आहे तर सुरक्षा चेक जपानी तज्ञ पुरवीत आहेत. लवकरच हि सेवा सर्वांसाठी सुरु होत आहे.

Leave a Comment