बदलत्या हवामानामध्ये तब्येतीची अशी घ्या काळजी - Majha Paper

बदलत्या हवामानामध्ये तब्येतीची अशी घ्या काळजी


मार्चचा महिना जसा सुरु झाला तशी थंडी मावळून उन्हाळ्याची चाहूल लागायला सुरुवात झाली आहे. हवामानातील हा बदल काहींना मानवतो, तर काहींच्या तब्येती बिघडू लागतात. अचानक सुरु झालेल्या गरमीमुळे फ्रीजचे पाणी, एसीची थंडगार हवा हा ही बदल अचानकच सुरु होतो. हे बदल जरी सुखावह वाटत असले, तरी अचानक होणारे हे बदल शरीराला अपायकारक ठरू शकतात. तामुळे हवामान बदलत असताना आपल्या आणि आपल्या परिवारजनांच्या आरोग्याची काळजी घेणे अगत्याचे आहे.

हवामान बदलत असताना व्हायरल इन्फेक्शन मुळे येणारा ताप मोठ्या प्रमाणावर आढळतो. ह्या शिवाय सर्दी, घसा खराब होऊन येणारा खोकला, कावीळ, टायफॉइड, हे विकारही हवामान बदलत असताना जास्त पाहायला मिळतात. लहान मुले आणि वयस्क, वृद्ध मंडळी यांची रोगप्रतिकारशक्ती कमी असल्याने त्यांना हे आजार होण्याचा धोका जास्त असतो. अश्या वेळी हवामान बदलत असताना काही गोष्टींची काळजी घेतल्यास आजार उद्भविण्याचा धोका पुष्कळ अंशी कमी होऊ शकतो.

बदलत्या हवामानाच्या सुमाराला पूर्ण बाह्यांचे कपडे वापरावे. एकदा उन्हाळा व्यवस्थित सुरु झाला की मग बिनबाह्यांचे किंवा लहान बाह्यांचे कपडे वापरावेत. त्याचबरोबर घराबाहेर काही खाता पिताना काळजी घ्यावी. फ्रीजमधील पाणी पिणे शक्यतो टाळावे. साधे पाणी आणि थंड पाणी असे मिसळून प्यायल्यास चांगले. विशेषतः घरातील लहान मुले आणि वृध्द व्यक्ती यांना फ्रीजमधील एकदम थंड वस्तू खाण्यापासून परावृत्त करावे. तसेच काहीही खाण्यापूर्वी आपले हात स्वछ असतील याची काळजी घ्यायला हवी.

बाहेर पडण्यापूर्वी उन्हापासून बचाव करण्यासाठी टोपी, छत्री बरोबर असावी. तसेच पिण्याचे पाणी देखील बरोबर असावे. उन्हामध्ये फिरत असताना उसाच्या रसाचे गुऱ्हाळ दिसले, की उसाचा रस पिण्याचा मोह आवरत नाही. अश्या वेळी उसाच्या रसामध्ये बर्फ न घालता रस प्यावा. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ताजी फळे भरपूर खावीत, व तेलकट मसालेदार पदार्थ कमी खावेत. आपल्या आहारामध्ये भरपूर साधे पाणी, ताक, फळांचे रस, लिंबाचे किंवा कोकमचे सरबत यांचा समावेश करावा.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment