भीमा-कोरेगाव हिंसा; डॉ. आंबेडकर यांच्या पक्षाकडून नुकसान भरपाई वसूल करा


मुंबई : मुंबई उच्च न्यायालयात भीमा-कोरेगाव दंगलीनंतर महाराष्ट्र बंदची हाक देणाऱ्या डॉ. प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षाकडून नुकसान भरपाई म्हणून ५० कोटी रूपये वसूल करा, अशी मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली असून ही याचिका माजी आयपीएस अधिकारी ज्युलिओ रिबेरो यांच्या अॅक्शन फॉर गुड गव्हर्नर या सेवाभावी संस्थेमार्फत दाखल करण्यात आली आहे.

यावर न्यायमूर्ती शंतनू केमकर आणि न्यायमूर्ती एम.एस. कर्णिक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली असता उच्च न्यायालयाने राज्य सरकारला यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी चार आठवड्यांचा अवधी दिला आहे. जानेवारी महिन्यात भीमा कोरेगाव येथे घडलेल्या घटनेनंतर राज्यभरात जो हिंसाचार उसळला होता. त्यासाठी डॉ. प्रकाश आंबेडकर यांच्या राजकीय पक्षासह कट्टर हिंदुत्ववादी संघटनांनाही या याचिकेत जबाबदार ठरवण्यात आले आहे. या याचिकेतून याप्रकरणी दोषी असलेल्या सर्वांवर कारवाई करा, आणि सार्वजनिक मालमत्तेची झालेली नुकसानभरपाई वसूल करा. अशी मागणी करण्यात आली आहे. या संपूर्ण हिंसाचारात एकूण ५० कोटींच्या मालमत्तेचे नुकसान झाल्याची माहीती राज्य सरकारने उच्च न्यायालयात दिली आहे.

या याचिकेला उत्तर देताना राज्य सरकारने उच्च न्यायालयात माहीती दिली की, या संपूर्ण हिंसाचारादरम्यान कायदा सुव्यवस्थेची चोख जबाबदारी राज्य सरकारने सांभाळली. केवळ मुंबईत एकूण ७४ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. या प्रकरणात सुमारे ५०० जणांना अटक करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.