युरोप हिमवर्षाव आणि प्रचंड थंडीने गारठला


युरोपातील मोठा भाग सध्या प्रचंड हिमवर्षाव आणि हाडे गोठविणारया थंडीने गोठला असून नेदरलँड्सची राजधानी अॅमस्टरडॅम येथील कालवे पूर्ण थिजले आहेत. नागरिक आणि पर्यटक या गोठलेल्या कालव्यातून आईसस्केटिंग आणि आईस हॉकीचा आनंद लुटत असल्याचे फोटो सोशल मिडीयावर झळकले आहेत.

अर्थात हे खेळ धोकादायक ठरले असून दोन दिवसापूर्वीच गोठलेल्या कालव्यात स्केटिंग करणारे दोघे बर्फाचा पातळ थर असलेल्या भागात गेले आणि बर्फ फोडून कालव्यात कोसळले. त्यांना त्वरित बाहेर काढले गेल्याने त्यांचे प्राण वाचल्याचे समजते. नेदरलंड प्रमाणे युरोपचा अनेक भागात बर्फवर्षाव होत असून अनेक विमान उड्डाणे रद्द केली गेली आहेत. या भागात सार्वजनिक जीवन विस्कळीत झाले असल्याचे समजते.