प्रवासादरम्यान अशी करा पैशांची बचत


आता लवकरच मुलांच्या परीक्षा संपून शाळांना सुट्या लागतील, आणि घराघरामध्ये सुट्टीसाठी कुठे जायचे याच्या चर्चा रंगतील. प्रत्येकाचे मत वेगळे असते. कोणाला परदेशामध्ये जायचे असते, कोणाला घरापासून फारसे दूरवर जाण्याची इच्छा नसते, कोणाला समुद्रकिनारी जायचे असते, तर कोणाला काश्मीर सारख्या ठिकाणी जाऊन बर्फाच्छादित पर्वतराजी पाहण्याचा आनंद लुटायचा असतो. पण या सगळ्यामध्ये महत्वाचा भाग असतो तो म्हणजे प्रवासखर्चाचा. सुट्टीचे दिवस लक्षात घेऊन विमानांच्या तिकीटांच्या आणि हॉटेल्स च्या किंमतीमध्ये वाढ झालेलीच असते. त्यातून ऐनवेळी सुट्टीचा कार्यक्रम ठरला, तर चांगल्या हॉटेल्समधे बुकिंग मिळणे दुरापास्त होऊन जाते. त्यामुळे बहुतेक वेळी सुट्टीवर जाण्याचा कार्यक्रम काही महिने आधीपासूनच ठरविला जात असतो.

बहुतेकवेळी सुट्ट्यांच्या दिवसांमध्ये आणि साप्ताहिक सुट्टी ( शनिवार-रविवार )च्या दिवशी तिकिटे महाग असतात. त्यामुळे प्रवासाच्या तारखा निश्चित नसतील, तर त्या संपूर्ण महिन्यामध्ये तिकिटांचे भाव काय असतील याची साधारण कल्पना तुम्हाला ऑनलाईन वेबसाईट्सद्वारे घेता येऊ शकेल. प्रवास तिकिटांचे आणि हॉटेल चे बुकिंग करताना ‘ प्रायव्हेट ब्राउझिंग ‘ किंवा ‘ ईनकॉग्निटो मोड ‘ चालू ठेवा. यामागे कारण असे, की ट्रॅव्हल साईट्स तुमच्या वेब व्हिजिट्सवर लक्ष ठेऊन असतात.

विमानाने प्रवास करीत असताना काही वेळा सामान मर्यादेपेक्षा जास्त वजनाचे झाल्याने दंड भरावा लागतो. त्यामुळे प्रवासाला निघण्याआधी सामान मर्यादेपेक्षा जास्त होणार नाही याची काळजी घ्यावी. विमानतळावर ऐनवेळी सामान जास्त होत आहे असे लक्षात आले, तर तुम्ही बरोबर नेत असलेले जॅकेट/ शाल / स्वेटर / बॅगेतून काढून अंगात घालावे, किंवा हँड बॅगेज मध्ये ठेवावे. आजकाल तुम्ही लहान सहान वस्तू नेऊ शकाल अशी खास जॅकेटे बाजारामध्ये उपलब्ध आहेत. या जॅकेट्स ना भरपूर खिसे असतात. या खिश्यांमध्ये तुम्ही भरपूर सामान ठेऊ शकता.

हॉटेल्स मध्ये बुकिंग करण्याऐवजी एअर बीएनबी किंवा होम स्टे पर्याय, नक्कीच पैश्यांची बचत करणारा पर्याय आहे. तुमचे पैसे तर वाचतीलच, पण त्याशिवाय तुम्ही जिथे जाणार असाल, तिथल्या स्थानिक संस्कृतीचा अनुभव तुम्ही होम स्टे द्वारे घेऊ शकता. आपल्याला आवडेल तसे एअर बीएनबी तुम्ही थोडासा ऑनलाईन रिसर्च करून निवडू शकता. हॉटेल्समध्ये राहणार असल्यास तिथे तीन मिल्स पैकी एक मील ( जेवण ) ‘ कॉम्प्लीमेंटरी ‘ असते. त्यामुळे त्यावेळी भरपूर नाश्ता करून घेऊन इतर वेळी स्थानिक फूड जॉइंट्स मधील भोजनाचा आनंद लुटा. स्थानिक पदार्थांची किंमत बहुतेकवेळी स्वस्त असते.

प्रवास करताना नेहमी मोबाईल अॅप्सचा वापर करा. अगदी तुम्ही ज्या ठीकाणी जाणार असाल, त्या ठीकाणाबद्दल सविस्तर माहिती देण्यापासून ते तुमच्या खिशाला परवडणारी रेस्टॉरंट, इतर आसपासची पर्यटनस्थळे, तिथे जाण्यासाठी वाहन व्यवस्था याबद्दल माहिती देणारी अनेक अॅप्स आजकाल उपलब्ध आहेत. य मुळे तुमचे पैसे वाचतीलच, शिवाय तुम्हाला आवश्यक असलेली माहिती देखील खात्रीशीर रित्या तुम्हाला उपलब्ध होईल.

Leave a Comment