मेजवानीनंतर करा ‘डी-टॉक्स’


होळी आणि त्याच्या जोडीला आलेले शनिवार रविवारची सुट्टी साधून आपल्यापैकी अनेक जणांनी मेजवानीचा बेत आखला असेल, परिवार आणि मित्रमंडळींच्या संगतीमध्ये रात्रभर जागून गप्पाष्टके झोडली असतील, किंवा तीन दिवस सलग सुट्टी आल्याने भरपूर भटकंती करीत ठिकठीकाणी जेवायला जायचा कार्यक्रम योजला असेल. तीन चार दिवस सणाच्या निमित्ताने, किंवा सुट्टीच्या निमित्ताने आपले मन मानेल तसे आणि मन मानेल तितका आपल्या आवडत्या पदार्थांवर ताव मारत असताना आपण आपले आहारनियम नक्कीच शिथिल केले असतील.

हे सगळे करीत असताना झोप अपुरी झाल्याने किंवा प्रमाणाबाहेर मसालेदार पदार्थांचे सेवन झाल्याने शरीरामध्ये लहान सहान तक्रारी उद्भविण्यास सुरुवात होते. डोळे लाल असणे, चेहऱ्यावर सूज असणे, अपचन, बद्धकोष्ठ, या तक्रारी डोके वर काढू लागतात. अश्या वेळी गरज असते आपण सेवन केलेल्या अन्नातून शरीरामध्ये जे घातक पदार्थ गेले आहेत, त्यांना बाहेर काढण्याची, म्हणजेच शरीराला डी-टॉक्स करण्याची.

जर मेजवानीच्या काळामध्ये मद्यपान केलेले असेल, तर त्यामुळे लिव्हरवर दुष्परिणाम होत असतात. तसेच यामुळे शरीरातून क्षार कमी होऊन डीहायड्रेशन होऊ शकते. तसेच जास्त तेलकट, मसालेदार, गोड पदार्थांच्या सेवनाने अॅसिडीटी, अपचन यांसारख्या तक्रारी सुऊ होतात. हे टाळण्यासाठी मेजवानी नंतर काही काळासाठी लो फॅट अन्नपदार्थांचे सेवन करावे. यामध्ये आपल्या आहारात धान्य, ताज्या भाज्या, फळे यांचा समावेश करावा. तसेच भरपूर पाणी प्यावे. फायबर ने युक्त आणि पचण्यास हलके पदार्थ शरीरामधून घातक तत्वे बाहेत टाकण्यास सहायक आहेत.

आपण जर दिवसातून अनेकदा चहा किंवा कॉफीचे सेवन करीत असाल, तर ते प्रमाण कमी करावयास हवे. त्याऐवजी ग्रीन टी, शहाळ्याचे पाणी, साधे पाणी, ताक, ताज्या भाज्यांचे रस यांचे सेवन करावे. गोड खाण्याची इच्छा झाल्यास ताजी फळे, किंवा फळांचे रस साखर न घालता प्यावेत. दररोज किमान सात ते आठ ग्लास पाण्याचे सेवन करावे. पाण्यामुळे शरीरातील टॉक्झिन्स बाहेर पडतील आणि वॉटर रीटेन्शनचे प्रमाण कमी होईल. शरीराचे तापमान नियंत्रित राहावे आणि रक्ताभिसरण शरीरामध्ये सुरळीत राहावे यासाठी भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. तसेच आपल्या आहारामध्ये ई जीवनसत्वाचे प्रमाण वाढवावे. असे करण्यासाठी अक्रोड, शेंगदाणे, बदाम, सूर्यफुलाच्या बिया, जवस इत्यादी पदार्थांचा आपल्या आहारामध्ये समावेश करावा.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment