‘होम स्टे’ साठी जाताना..


आजकाल भ्रमंतीसाठी गेल्यानंतर एखाद्या हॉटेलमध्ये राहण्याऐवजी ‘होम स्टे’ चा पर्याय लोकांना अधिक पसंत पडू लागला आहे. विशेषतः परदेशामध्ये भ्रमंतीसाठी जाणार असल्यास हा पर्याय निवडण्यास हरकत नाही. परप्रांतामध्ये गेल्यानंतर, तेथील परंपरा, संस्कृती, जीवनशैली समजून घेण्यासाठी त्या ठिकाणी अनेक पिढ्यांपासून वसलेल्या कुटुंबांमध्ये मिसळून त्यांच्या घरांमध्ये त्यांच्या समवेत राहण्याचा अनुभव नवा, रोचक म्हणावा लागेल.

आपण ज्या ठिकाणी जाणार असाल, त्या ठिकाणची स्थानीय संस्कृती, जीवनशैली, आणि खानपान समजून घेण्यासाठी होम स्टेचा पर्याय उत्तम असला, तरी हा पर्याय निवडताना काही अलिखित नियम लक्षात घेणे आवश्यक आहे. शेवटी कितीही नाही म्हटले, तरी आपण ज्या घरामध्ये राहणार असाल, ते घर आणि त्या व्यक्ती आपल्याला फारशा परिचयाच्या नसतात. त्यामुळे त्यांना आणि आपल्याला कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही हे पाहणे अगत्याचे आहे. आपण होम स्टे करिता जिथे राहणार असाल, त्या जागेची माहिती, तिथे कसे पोहोचायचे, आसपासचे रस्ते, आणि इतर आवश्यक ठिकाणे, म्हणजेच हॉस्पिटल, पोलीस स्टेशन, इत्यादी ठिकाणाची माहिती आधीपासूनच करून घेणे गरजेचे आहे. तसेच त्या ठिकाणी आपल्या परिचयाचे इतर लोक असल्यास त्यांचे फोन नंबर आठवणीने बरोबर घ्यावेत, म्हणजे अगदीच कुठली मदत लागली, तर तुम्ही तुमच्या परिचयाच्या व्यक्तींना संपर्क करू शकता.

होम स्टे साठी गेल्यानंतर आपण प्राथमिक शिष्टाचार लक्षात ठेवायला हवेत. आपल्याला राहण्यासाठी दिलेली खोली नेहमी स्वछ ठेवावी. तसेच घरातील इतर सदस्यांना घरातील कामांमध्ये मदत करावी. दिवसभरातून एखाद्या वेळेचे भोजन तरी यजमान आणि त्यांच्या परिवारजनांसोबत घ्यावे. तुमच्या उठण्या-बसण्याच्या, वागण्या-बोलण्याच्या पद्धतीवरून, यजमान देखील तुमच्या व्यक्तिमत्वाची पारख करीत असतात हे लक्षात ठेवावे.

तुम्हाला स्थानिक पर्यटनस्थळे पहायची असल्यास किंवा भटकंती करायची असल्यास त्याबद्दल तुमच्या यजमानांशी चर्चा करावी. तुमचे यजमान तेथील स्थानिक रहिवासी असल्याने कुठे जायचे, कसे जायचे ह्याबद्दल खात्रीशीर माहिती तुम्हाला देऊ शकतील. तसेच यजमानांच्या घरी भोजन करीत असताना आपल्या खाण्या-पिण्याच्या वैयक्तिक आवडी-निवडी बाजूला ठेवाव्यात. मात्र एखाद्या खाद्यपदार्थाची तुम्हाला अॅलर्जी असेल तर त्याबद्दल यजमानांना पूर्ण कल्पना द्यावी.

होम स्टे चा पर्याय निवडताना, ज्या घरी तुम्ही राहणार असाल तिथे मोकळ्या मनाने, म्हणजेच मनामध्ये कोणत्याही प्रकारचे पूर्वग्रह न बाळगता जावे. आपल्या घरी राहण्याची पद्धत आणि इतरांच्या घरामध्ये राहण्याची पद्धत एकसारखी असू शकत नाही. त्यामुळे इतरांच्या घरामध्ये राहताना त्यांच्या पद्धती स्वीकारण्याची तयारी असायला हवी. त्यामुळे अवास्तव अपेक्षा ठेऊ नयेत. तुमचा ‘स्टे’ सर्वतोपरी आरामदायक असावा असा तुमच्या यजमानांचा देखील प्रयत्न असतोच. त्यामुळे अगदीच कोणत्या प्रकारची असुविधा तुम्हाला जाणविली तर नम्रपणे यजमानांना त्याबद्दल सांगावे. ह्या काही गोष्टी लक्षात ठवल्याने तुमचा होम स्टे चा अनुभव यादगार ठरेल, यात शंका नाही.

Leave a Comment