कामावरून रजा घेण्यात भारतीय अग्रणी कसे?


आजकाल, ‘कामामुळे अगदी झोप उडाली आहे’, हे वाक्य दहातील किमान सहा जणांच्या तोंडी हमखास असतेच. कामांचा ताण, डेडलाईन्स, सततचा प्रवास या मुळे नोकरी किंवा व्यवसायामध्ये व्यस्त असणाऱ्या लोकांची झोप अक्षरशः पळाली आहे. एसोचेम हेल्थकेअर समितीच्या अहवालानुसार भारतामध्ये कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये कार्यरत असलेले सुमारे ५६ टक्के लोक चोवीस तासांमध्ये जेमतेम सहा तासांची विश्रांती घेतात. यामागचे मुख्य कारण म्हणजे कामाचा वाढता ताण, आणि कामे पूर्ण करण्यासाठी दिलेल्या डेडलाईन्स काटेकोरपणे पाळणे, हे आहे. या कारणांमुळे या कर्मचाऱ्यांच्या शरीराला आणि मनाला आवश्यक ती विश्रांती मिळत नाही.

कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना अनुचित आणि अवास्तविक टार्गेट्स दिली गेल्याने कर्मचारी मानसिक दृष्ट्या त्रस्त राहू लागले असून, त्यामुळे सतत थकवा, शारीरिक व्याधी, मनोवैज्ञानिक तणाव वाढत आहे. याचे दुष्परिणाम कर्मचाऱ्यांच्या कामावरही होत आहेत. त्याचमुळे कर्मचारी वेळोवेळी रजा घेताना दिसतात, असे निदान या अहवालामध्ये करण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांवर कामासोबत वरिष्ठांचा आणि सहकर्मचाऱ्यांचा देखील दबाव असतो, त्या कारणाने मानसिक तणावामध्ये वाढ होताना दिसत असल्याचे या अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे.

या अहवालानुसार भारतीय कार्यबलातील सुमारे ४६ टक्के व्यक्ती मानसिक तणावाने ग्रस्त असल्याचे दिसून आल्याचे म्हटले आहे. हा मानसिक तणाव, कधी व्यक्तिगत कारणांमुळे, कधी कामाच्या ठिकाणी चाललेल्या लहान मोठ्या कटकटी, हेवेदावे, किंवा कामाचे अतोनात प्रेशर यांच्या मुळे येत असल्याचे म्हटले आहे. या सर्व कारणांमुळे कर्मचाऱ्यांमध्ये ‘ मेटाबोलिक सिंड्रोम ‘ वाढीला लागला असून त्यांच्यामध्ये मधुमेह, उच्चरक्तदाब, लठ्ठपणा, हाय कोलेस्टेरोल अश्या व्याधींचे प्रमाण वाढू लागल्याचे अहवालात स्पष्ट केले गेले आहे. या मानसिक तणावापासून काही काळ मोकळीक मिळविण्यासाठी, किंवा सतत लहान सहान व्याधी डोके वर काढीत असल्याने भारतीय लोक नोकरीवरून जास्त प्रमाणात रजा घेत असल्याचे निदान अहवालात करण्यात आले आहे.

Leave a Comment