पंजाबच्या भटिंडा जवळ हररंगपुरा येथे राहणारे १२० वर्षांचे भगवानसिंग आणि १२२ वर्षांच्या त्यांच्या पत्नी धनकौर यांनी त्याच्या लग्नाचा १०० वा वाढदिवस कुटुंबियांसमवेत मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला. आधार कार्डावर भगवानसिंग याचा जन्म १ जानेवारी १९०० रोजी झाल्याचे नमूद असले तरी भगवानसिंग याच्या म्हणण्यानुसार त्यांचा जन्म १८९८ साली तर पत्नीचा जन्म १८९६ साली झाला आहे. ग्रामीण भागात स्वातंत्र्यापूर्वी जन्माच्या नोंदी केल्या जात नसत मात्र भगवानसिंग याच्या मुलांची वये आणि गावातील जेष्ठ याच्या सांगण्यावरून त्याच्या वयाची खात्री पटत आहे.
या जोडप्याने साजरा केला लग्नाचा १०० वा वाढदिवस
भगवानसिंग यांना पाच मुली व एक मुलगा आहे. त्यांची मोठी मुलगी ९० वर्षांची आहे तर सर्वात धाकटा मुलगा नात्था ५५ वर्षांचा आहे. या लोकांना गीनीज बुक मध्ये नाव नोंदविण्या संदर्भात काहीच माहिती नाही त्यामुळे या वृद्ध जोडप्याचे नाव नोंदिविले गेले नाही असे समजते.
भगवानसिंग याचा मुलगा नात्था सांगतो जन्मभर आई वडील अतिशय साधे आयुष्य जगले. व्यसन नाही, साधा आहार आणि वयाच्या १०० पर्यंत शेतात काम अशी त्याची राहणी होती. या दोघांनीही अपार कष्ट केले आहेत. आजही फाळणीच्या आठवणीनी ते गहिवरतात. त्यांच्या कुटुंबात सध्या १२ जण आहेत. भगवानसिंग आणि धनकौर त्यांची चौथी पिढी पाहत आहेत.