च्यवन ऋषींनी स्थापलेले चंद्रकेश्वर मंदिर


भारतात शेकडोंनी शिवमंदिरे आहेत. त्यातील अनेक वैशिष्ट्यपूर्ण आहेत. इंदोरपासून ६५ किमी वर असलेले चंद्रकेश्वर शिवमंदिर असेच वेगळे मंदिर असून या मंदिरातील शिवलिंग पाण्याखाली आहे. भाविक पाण्यातच या शिवलिंगाची पूजा करतात. च्यवन ऋषींनी हे लिंग स्थापले असल्याचे सांगितले जाते. हे लिंग दोन ते तीन हजार वर्षे जुने आहे. या मंदिरात नर्मदा माता स्वतःच प्रकट झाल्याची भावना आहे.

अतिशय निसर्गरम्य ठिकाणी असलेले हे मंदिर चोहोबाजूंनी सातपुड्याच्या पर्वत रांगा आणि घनदाट जंगलाने वेढलेले आहे. येथे भाविकांची नेहमीच मोठी गर्दी असते. असे सांगतात की च्यवन ऋषींनी येथे तपस्या केली होती. ते स्नानासठी रोज ६० मैल दूर असलेल्या नर्मदा नदीवर जात असत. त्याच्या तपस्येने नर्मदा प्रसन्न झाली आणि तुमच्या मंदिरात मी प्रकट होईन असा आशीर्वाद दिला. पण ऋषींना नर्मदा खरोखर आली याची प्रचीती हवी होती म्हणून त्यांनी त्याच्या गमछा नदीकाठी सोडला व ते परत तपस्येच्या ठिकाणी आले.

दुसरे दिवशी पाण्याचा एक प्रचंड स्रोत तेथे उगम पावला तेव्हा ऋषींचा गमछा शिवलिंगावर लपेटलेला दिसला. त्यावरून नर्मदा माता खरोखरच आल्याची खात्री पटली. या मंदिरापासून जवळ परमार व प्रतिहार काळातील अनेक अद्भुत प्रस्तरशिल्पे आहेत. मंदिराजवळ खडकात कोरलेली दुर्लभ प्रतिमा प्रतिहार काळातील असल्याचे सांगितले जाते. या भागात गुहा, किल्ले याचे अवशेष आहेत तेही पाहता येतात.

Leave a Comment