बँकांकडून व्याजदरात वाढ; गृह कर्जासह अन्य कर्जांचा हप्ता वाढणार


नवी दिल्ली : कर्जावरील व्याजदरात स्टेट बॅंक ऑफ इंडियासह आयसीआयसीआय बॅंक आणि पंजाब नॅशनल बॅंक यांनी वाढ केली असून या बॅंकांच्या पावलांवर पाऊल ठेवून इतर बॅंकांही व्याजदरवाढीचे पाऊल उचलण्याची शक्‍यता असल्यामुळे गृह कर्जासह अन्य कर्जांचा हप्ता आता वाढणार आहे.

बॅंकेकडील रोख रक्कम कमी झाल्याने ठेवींवरील व्याजदरात स्टेट बॅंक ऑफ इंडियाने अर्धा टक्का वाढ केली आहे. याचबरोबर बॅंकेने १ मार्चपासून कर्जदरात ०.२० टक्के वाढ केली असल्यामुळे कर्जदर ७.९५ वरून ८.१५ टक्‍क्‍यांवर आला आहे. आयसीआयसीआय बॅंक आणि पंजाब नॅशनल बॅंकेने याचप्रमाणे १ मार्चपासून एमसीएलआरमध्ये ०.१५ टक्के वाढ केली आहे. पंजाब नॅशनल बॅंकेने गृहकर्जासाठी व्याजदर ८.६ टक्के आणि महिला कर्जदारांसाठी तो ८.५५ टक्के केला आहे.

आगामी काळात इतर बॅंकाही कर्जदरात वाढ करण्याचे पाऊल उचलणार आहेत. पुढील आठवड्यात एचडीएफसी बॅंक व्याजदरांचा आढावा घेणार आहे. चलनवाढीतील वाढ लक्षात घेता रिझर्व्ह बॅंकेकडून व्याजदर कपात होण्याची शक्‍यता कमी झाल्याचे मत नुकतेच मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रह्मण्यम यांनी व्यक्त केले होते.

Leave a Comment