डोके दुखत असल्यास आजमावा हे घरुगुती उपाय


सध्याच्या सततच्या धावपळीच्या काळामध्ये, करावी लागणारी कामे आणि घ्याव्या लागत असणाऱ्या जबाबदाऱ्या यांच्यामुळे शारीरिक आणि मानसिक तणाव असतोच. ह्या तणावामुळे अनेक लहान मोठे विकार पाठी लागतात. डोके दुखी हा असाच विकार आहे जो अपुरी झोप, शरीराला पुरेशी न मिळणारी विश्रांती, कॉम्प्युटरवर जास्त काळ काम केल्याने येणारा ताण अश्या गोष्टींमुळे उद्भवितो. डोकेदुखी सुरु झाली की आपण पटकन डिस्परीन किंवा क्रोसिनची गोळी घेतो. पण ही औषधे वारंवार घेतली गेली, तर कालांतराने याचा परिणाम कमी होऊ लागतो. त्यामुळे औषधे घेण्याऐवजी काही घरगुती उपायांचा अवलंब करून डोकेदुखी पासून मुक्तता मिळविता येऊ शकते.

सुंठ डोकेदुखी कमी करण्यासाठी सहायक आहे. त्यामुळे डोकेदुखी उद्भविल्यास सुंठीची पूड पाण्यामध्ये मिसळून दाटसर पेस्ट तयार करावी आणि हा लेप कपाळावर लावावा. विशेषतः सर्दी झाल्यामुळे होणाऱ्या डोकेदुखीवर हा उपाय लगेच लागू पडतो. त्याचप्रमाणे तुळस आणि आल्याचा वापर करून ही डोकेदुखी कमी करता येऊ शकते. या साठी तुळशीच्या पानांचा आणि आल्याचा रस एकत्र करावा. हा रस कपाळावर लावावा. डोके जास्त दुखत असल्यास हा रस प्यायल्याने देखील गुण येतो.

लवंगेच्या तेलाने कपाळ चोळल्याने देखील डोके दुखी थांबण्यास मदत होते. कपाळावर लावण्याआधी तेल थोडे कोमट करून घ्यावे. लवंगेचे तेल वेदनाशामक आहे. डोकेदुखी कमी करण्यासाठी लवंगेच्या तेलाचे काही थेंब रुमालावर टाकून ते हुंगत राहावे. लवंगेच्या तेलाच्या वासाने डोकेदुखी कमी होण्यास मदत मिळते. तसेच काळ्या, बिनदुधाच्या चहामध्ये लिंबाचा रस घालून हा चहा प्याल्याने डोकेदुखी कमी होण्यास मदत होते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment