फास्ट फूड देखील बनविता येईल आरोग्यपूर्ण


फास्ट फूडची आपल्याशी ओळख आपल्याशी काही दशकांपूर्वी झाली, आणि आपल्या आयुष्यांमध्ये पाऊल टाकता क्षणीच त्याने आपल्याला त्याची चटकच लावली. आताच्या काळामध्ये लहान मुलांपासून ते अगदी आजी आजोबांपर्यंत, फास्ट फूडची आवड सर्वांनाच असते. त्यामुळे शनिवार रविवारच्या सुटीच्या दिवशी बाहेर पडले, की फास्ट फूडची मेजवानी देखील हमखास असतेच. सुरुवातीला, मुलांसाठी थोडा बदल, आणि आठवडाभर घरामध्ये सतत कामामध्ये गुंतलेल्या आईला विश्रांती म्हणून फास्ट फूडचा पर्याय आपण सर्वांनीच आनंदाने मान्य केला. पण पाहता पाहता हे फास्ट फूड आपल्या आहाराचा अविभाज्य भाग बनून गेले. मुलांचे वाढदिवस, किंवा एखाद्या प्रयोजनानिमित्त दिली गेलेली मेजवानी घरी साजरे होण्याऐवजी एखाद्या चांगल्याशा फास्ट फूड जॉइंट मध्ये साजरी होऊ लागली.

वारंवार फास्ट फूड खात राहिल्याने त्याचे दुष्परिणाम कालांतराने दिसून येऊ लागले. वजन वाढू लागले, शरीराच्या हालचालींमध्ये शिथिलता येऊ लागली. आणि एकदा वजन वाढण्यास सुरुवात झाली, की त्यामागे मधुमेह, उच्च रक्तदाब हे विकारही उद्भविण्याचा धोका वाढू लागला. सुदैवाने सध्याची पिढी आपल्या खानपानाबद्दल जास्त जागरूक राहू लागली आहे. त्यामुळे फास्ट फूड आपल्या आहारामधून संपूर्णपणे वर्ज्य न करता, त्यांनी हेच फास्ट फूड जास्त आरोग्यपूर्ण, हेल्दी कसे बनविता येईल याचा विचार केला. ही विचासरणी लक्षात घेऊन, अलीकडे बहुतेक फास्ट फूड जॉइंट्स देखील आरोग्यपूर्ण फास्ट फूडचा पर्याय आपल्या ग्राहकांना उपलब्ध करून देत आहेत. त्यामुळे आपल्या आवडत्या बर्गरमध्ये थोडेसे बदल करून आपण फास्ट फूडचा आनंद देखील घेऊ शकता, आणि योग्य वस्तू आपल्या आहारात समाविष्ट केल्याचे समाधान देखील तुम्हाला लाभते.

तुम्हाला बर्गर आवडत असल्यास, त्यामध्ये बटाट्याच्या ऐवजी पनीर, टोफू, इत्यादी फिलिंग्स भरून तो अधिक चवदार आणि हेल्दी बनविता येऊ शकेल. त्याचबरोबर बर्गरमध्ये मेयोनेज चा कमी प्रमाणात वापर करावा. दोन जेवणांच्या मधल्या वेळेतील भूक हा सगळ्यात धोकादायक काळ असतो. या वेळी जेवण करण्याइतकी भूक नसते, पण काही तरी खायला हवे असे वाटत असते. त्यामुळे ह्या वेळेमध्ये चिप्स, चिवडे, असल्या गोष्टी खाण्याची सवय लागते. अश्या वेळी आपल्या आसपास शेंगदाणे, सुका मेवा, सुकी भेळ अश्या वस्तू असाव्यात.

जर तुम्हाला गोड आवडत असेल, तर केक किवा पेस्ट्रीज ऐवजी मफिन्स हा तुमच्याकरिता चांगला पर्याय आहे. मफिन्स मैद्याऐवजी गव्हाचे पीठ वापरून तयार करता येतात. ह्यामध्ये निरनिराळ्या फळांचा वापर करून मफिन्स अधिक चविष्ट बनविता येतात. अश्या प्रकारे बनविले गेलेले मफिन्स बाजारामध्येही सहज उपलब्ध असतात. मुलांना देखील सहज आवडेल असा हा एक पदार्थ आहे.

सामोसे, पाणी पुरी, भेळ या वस्तू घरी देखील तयार करता येऊ शकतात. घरी तयार केलेल्या वस्तू आपोआपच स्वछ पद्धतीने तयार केल्या जातात. तसेच या मध्ये वापरले गेलेले साहित्य देखील उत्तम प्रतीचे असते. त्यामुळे आरोग्याची हेळसांड टाळता येणे शक्य होते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment