निसर्गाच्या सान्निध्यात राहणाऱ्या महिला होतात दीर्घायुषी


अमेरिकेतील एका रिसर्चनुसार ज्या महिला जास्त काळ निसर्गाच्या सान्निध्यात राहतात, त्यांना दीर्घायुष्य लाभते. हार्वर्ड विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या वतीने हा शोधनिबंध ‘ एन्व्हायर्नमेंटल हेल्थ पर्स्पेक्टीव्हस् ‘ मध्ये सादर करण्यात आला आहे. या शोधनिबंधामध्ये दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण शहरीकरण झालेल्या, निसर्गाच्या सान्निध्यापासून लांब असणाऱ्या महिलांचे आयुष्य, निसर्गाच्या सान्निध्यात राहणाऱ्या महिलांच्या आयुष्यमाना पेक्षा कमी असण्याची शक्यता असते.

या शोधाच्या अंतर्गत सुमारे १ लाख महिलांच्या आयुष्यामानाचे अवलोकन केले गेले. अमेरिकेतील काही शहरांमधील राहणाऱ्या या महिलांच्या आयुष्यामानाचे अवलोकन २००० ते २००८ या काळा दरम्यान केले गेले. हे अवलोकन केल्यानंतर वैज्ञानिकांनी निसर्गाचे महत्व पटविणारा हा निष्कर्ष काढला आहे. विशेषतः कर्करोग आणि श्वसनरोगाने ग्रस्त असलेल्या बहुतेक महिला शहरी भागामध्ये राहणाऱ्या होत्या. या महिलांच्या घरांच्या जवळपास झाडे, मोकळी हवा, शांतता या गोष्टी उपलब्ध नव्हत्या. त्याउलट निरनिराळ्या प्रकारच्या प्रदूषणाचे प्रमाण या महिलांच्या घरांच्या आसपास जास्त होते.

निसर्गाच्या सान्निध्यात राहणाऱ्या महिलांच्या घरांच्या आसपास प्रदूषणाची मात्रा खूपच कमी होती, तसेच निरनिराळ्या प्रकारचे आवाज, गोंगाट यांपासून ही या महिला लांब होत्या. त्यामुळे अश्या ठिकाणी राहणाऱ्या महिलांच्या बाबतीत मानसिक तणाव देखील कमी आढळून आला. शहरापासून लांब असल्याने, आपल्या गरजेच्या वस्तू आणण्याकरिता या महिलांना प्रवास करावा लागतो, किंवा त्यांना आवश्यक असलेला भाजीपाला, त्या स्वतःच बागांमध्ये पिकावितात. त्यांच्या नित्त्याच्या कामांसाठी या महिला चालणे जास्त पसंत करतात. त्यामुळे या भागांमध्ये राहणाऱ्या महिलांची शारीरिक हालचाल आणि श्रम शहरांमध्ये राहणाऱ्या महिलांच्या मानाने जास्त असल्यामुळे त्यांना भरपूर व्यायाम ही मिळतो असे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment