या देशांमध्ये भारतीय वाहन चालक परवान्यावर चालवू शकता गाडी


भारताचे नागरिक म्हणून येथे तुम्हाला दिले गेलेले ड्रायव्हिंग लायसन्स भारताबाहेर देखील काही देशांमध्ये वैध आहे. म्हणजेच ह्या परवान्यावर तुम्ही बाहेरील काही देशांमध्ये गाडी चालवू शकता. त्यामुळे या देशांमध्ये भ्रमंतीसाठी किंवा काही कामानिमित्त जायची वेळ आली, तर तुम्ही गाडी भाड्यावर घेऊन ती चालवू शकता. त्यामुळे तेथील स्थानिक परिवहन व्यवस्थेवर अवलंबून न राहता तुम्हाला तुमच्या सोयीप्रमाणे ये-जा करण्याची मुभा राहील.

न्यू साउथ वेल्स, क्वीन्सलंड, साउथ ऑस्ट्रेलिया, आणि ऑस्ट्रेलिया कॅपिटल टेरीटरी या प्रांतांमध्ये तुम्ही वैध भारतीय ड्रायव्हिंग लायसन्स चा उपयोग करून गाडी चालवू शकता. स्वित्झर्लंड या देशामध्ये सुंदर निसर्गसौंदर्याचा आनंद घेत ड्रायव्हिंग करण्याचे स्वप्न सत्यात उतरणे शक्य आहे. इथे वैध भारतीय ड्रायव्हिंग लायसन्सवर तुम्ही गाडी चालवू शकता. जर तुमचे वास्तव्य काही काळाकरिता या देशामध्ये असेल, तर एक वर्षापर्यंत तुम्ही भारतीय ड्रायव्हिंग लायसन्स वापरून गाडी चालवू शकता. त्यानंतर मात्र तुम्हाला स्थानिक प्रशासनाने प्रमाणित केलेल्या लायसन्सची आवश्यकता असेल.

जर्मनी या देशामध्ये देखील वैध ड्रायव्हिंग लायसन्सचा वापर करून गाडी चालविता येते. या देशामध्ये आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग परमिटची आवश्यकता नाही. तसेच तुमचा वैध ड्रायव्हिंग लायसन्स जर इंग्रजीमध्ये बनलेला असेल, तर साउथ आफ्रिकेमध्ये तुम्ही हा लायसन्स वापरून गाडी चालवू शकता, मात्र तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स इंग्रजीमध्ये असणे, आणि त्यावर तुमचे छायाचित्र आणि तुमची सही असणे बंधनकारक आहे.

नॉर्वे या देशामध्ये वैध भारतीय ड्रायव्हिंग लायसन्सचा वापर करून तुम्हाला तीन महिन्यांपर्यंत गाडी चालविण्यास अनुमती आहे. ही समयसीमा संपल्यानंतर तुमच्या लायसन्सच्या वापरासाठी तुम्हाला मिळालेली परवानगी आपोआप रद्द होते. इंग्लंडमध्ये भारतीय ड्रायव्हिंग लायसन्सवर तुम्ही एक वर्षापर्यंत गाडी चालवू शकता. पण या लायसन्सवर तुम्ही लहान गाडी किंवा दुचाकी वाहनच चालवू शकता. मोठी गाडी चालविण्याची परवनागी तुम्हाला भारतीय ड्रायव्हिंग लायसन्सवर मिळू शकणार नाही. अमेरिकेमध्ये देखील तुम्ही भारतीय ड्रायव्हिंग लायसन्सवर गाडी चालवू शकता. मात्र इथे ही तुमचा लायसन्स इंग्रजी भाषेमध्ये बनलेला असणे आवश्यक आहे. ह्या लायसन्सचा वापर करून तुम्ही एक वर्षापर्यंत गाडी चालवू शकता.

Leave a Comment