काही देशांमधील अजब कायदे


जगभरामध्ये जितके देश आहेत, त्या सर्वांची स्वतःची कायदेव्यवस्था अस्तित्वात आहे. त्या त्या देशांमध्ये राहणाऱ्या सर्व नागरिकांसाठी त्या देशांच्या कायद्यांचे पालन करणे आवश्यक आहे. कायद्याच्या चौकटीमध्ये राहिल्याने त्या देशांमध्ये सुव्यवस्था ठेवणे शासनाला शक्य होत असते. नागरिकांचे हक्क, सुविधा, विकास, स्वातंत्र्य आणि सुरक्षा लक्षात घेऊनच शासनातर्फे नवनवीन कायदे अंमलात आणले जात असतात. पण जगातील काही देशांमधील काही कायदे इतके अजब आहेत, की ते कायदे अंमलात आणण्यामागे शासनाचा नेमका काय विचार असावा, याचा अंदाज बांधणे कठीण होऊन बसते.

जर तुम्ही स्वित्झर्लंडमध्ये असाल, आणि रात्री दहा वाजल्यानंतर जर तुम्हाला टॉयलेटचा वापर करण्याची वेळ आली, तर असे करताना दहा वेळा विचार करा. कारण या देशामध्ये रात्री दहा वाजल्यानंतर टॉयलेट फ्लश करण्यास कायद्याने बंदी आहे. जर या कायद्याचे उल्लंघन करताना कोणी आढळले, तर त्या व्यक्तीला शिक्षा होऊ शकते.

जर तुम्ही सिंगापूरला जाणार असाल, तर चुकुनही च्युईंग गम बरोबर नेऊ नका. जर सिंगापूरमध्ये प्रवेश करतानाच तुमच्याकडे च्युईंग गम आढळले, तर विमानतळावरच तुम्हाला भरमसाट दंड भरावा लागेल. च्युईंग गम खाणे, किंवा जवळ बाळगणे, हा सिंगापूरमध्ये कायद्याने शिक्षापात्र गुन्हा आहे. जर एखादी व्यक्ती सिंगापूरमध्ये च्युईंग गम खाताना आढळली, तर त्या व्यक्तीस एक हजार डॉलर्सचा दंड होऊ शकतो.

सामोआ या ठिकाणी पत्नीचा जन्मदिवस विसरणे हा कायद्याने गुन्हा आहे, तर फ्लोरिडा येथे जनावरांची नक्कल करणे हा कायद्याने गुन्हा आहे. अमेरिकेतील मिनेसोटा या ठिकाणी महिला आणि पुरुषांची अंतर्वस्त्रे एकत्र वाळत घालणे हा कायद्याने गुन्हा आहे. अश्या प्रकारचे कायदे देखील अस्तित्वात आहेत, आणि पाळले जात आहेत हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटल्यावाचून राहणार नाही.

मोन्टाना येथील बोज्मन या ठिकाणी सूर्यास्तानंतर प्रेमी युगुलांनी प्रणयक्रीडा करणे कायद्याने मना आहे, तर न्यूयॉर्क शहरामध्ये घरातील गच्चीवरून किंवा छतावरून खाली उडी मारणे हे देखील बेकायदेशीर आहे. नेवाडा येथे मिश्या असणाऱ्या पुरुषाने महिलांचे किंवा तरुणींचे चुंबन घेणे बेकायदेशीर आहे. डेन्मार्क देशामध्ये नवजात मुलाचे नाव ठेवताना आधी स्थानिक प्रशासनाची परवानगी घ्यावी लागते. प्रशासनाला मान्य असलेले नावच आपल्या मुलांना देणे नागरिकांसाठी बंधनकारक आहे.

Leave a Comment