नको राहुल, नको मोदी, पंतप्रधानपदासाठी राहुल द्रविडला पसंती


लोकसभेच्या निवडणुका २०१९ मध्ये होत आहेत. यावेळी देशाची धुरा राहुल गांधी याच्याकडे जाणार का मोदींकडे कायम राहणार अशी चर्चा जोर धरू लागली असतानाच सोशल मिडीयावर भारताच्या अंडर १९ क्रिकेट संघाचे प्रशिक्षकपद भूषविलेल्या राहुल द्रविड यालाच पंतप्रधान बनवावे अशी मोहीम सुरु झाली आहे.

अंडर १९ संघाला चौथ्यावेळी वर्ल्डकप विजेता बनविण्यात उत्तम कामगिरी बजावलेला तसेच खात्रीचा फलंदाज, संकटहरण कर्ता, द वॉल अश्या नावानी प्रसिद्ध असलेला राहुल त्याने नुकत्याच दाखविलेल्या दिलदारी आणि न्यायी वृत्तीमुळे एकदम प्रकाशात आला आहे आणि त्याच्यावर फॅन्सकडून स्तुती सुमनांचा वर्षाव होऊ लागला आहे. भारताच्या ज्युनिअर टीम ने वर्ल्डकप जिंकल्यावर बीसीसीआयने राहुलला ५० लाखाचे इनाम जाहीर केल्यानंतर मोह सोडून राहुलने या विजयात खेळाडू, सहप्रशिक्षक असे सर्वांचे समान योगदान आहे तेव्हा बक्षिसाची रक्कम सर्वाना समान हवी असे सांगितले आणि बीसीसीआयने ते मान्य करून सर्वाना २५-२५ लाख रुपये दिले. गायक संगीतकार विशाल ददलानी यांनी राहुल द्रविड पंतप्रधान पदासाठी अतिशय योग्य असल्याचे ट्वीट केले मात्र, याला दुजोरा देण्यासाठी फॅन्सनी प्रतिक्रियांचा पाउस पडला आहे.

कर्नाटक दौऱ्यात पंतप्रधान मोदी यांनीही राहुल द्रविडचे कौतुक करताना इमानदारी म्हणजे काय आणि दुसऱ्यांसाठी कसे जगायचे याचा आदर्श राहुलने घालून दिल्याचे सांगितले होते. तर राहुल द्रविड ने भारतीय ज्युनिअर संघाच्या विजयाचे सर्व श्रेय मला दिले गेले यामुळे लाजिरवाणे वाटल्याचे सांगताना या यशात सपोर्ट स्टाफ आणि खेळाडू याचाही तितकाच वाटा असल्याचे स्पष्ट केले होते. राहुल द्रविडच्या या भूमिकेचे सर्वांनाच कौतुक वाटले होते.