सौंदर्यप्रसाधने खरेदी करताना…


आजकाल बाजारामध्ये उपलब्ध असणाऱ्या प्रत्येक वस्तूची जाहिरात मोठ्या प्रमाणावर केली जात आहे. अनेकदा ह्या जाहिरातींना बळी पडून आपण अनेक वस्तूंची खात्री करून न घेताच त्यांची खरेदी करीत असतो. एखादी वस्तू खरेदी करून घरी आणली, की मग त्या वस्तूमधील एकेक उणीव समोर येत राहते आणि ती वस्तू खरेदी करण्याच्या निर्णयाचा पस्तावा होऊ लागतो. मात्र जाहिरातींना भुलून एखादे सौंदर्य प्रसाधन खरेदी करताना मात्र काळजी घेणे आवश्यक आहे. आपण खरेदी करीत असलेल्या प्रसाधनाबद्द्ल संपूर्ण खात्री करून मगच प्रसाधन खरेदी करावे. अन्यथा चुकीची प्रसाधने वापरून त्वचेवर अॅलर्जी येण्याची शक्यता असते. काही वेळा चुकीची प्रसाधने वापरल्याने त्वचेचे कायमचे नुकसान होण्याची देखील शक्यता असते. त्यामुळे सौंदर्यप्रसाधनांची खरेदी करताना काळजीपूर्वक करावी. सौंदर्यप्रसाधानांची खरेदी करताना बहुतेक वेळी केवळ त्यांचा रंग, ब्रँड बघितला जातो. पण ते प्रसाधन आपल्या त्वचेला साजेसे आहे किंवा नाही हे पाहणे देखील गरजेचे आहे.

सर्वप्रथम कोणतेही सौंदर्य प्रसाधन खरेदी करताना त्याचे सील व्यवस्थित आहे किंवा नाही याची खात्री करून घ्यावी. जर सील थोडे जरी उघडल्यासारखे वाटले, तर प्रसाधन खरेदी करू नये. प्रत्येक प्रसाधन बनविताना ते ठराविक प्रकारच्या स्कीन टाईप करिता किंवा ठराविक प्रकारच्या केसांकारिता बनविले जाते. त्यामुळे आपल्या त्वचेचा प्रकार किंवा केसांचा प्रकार नक्की कुठल्या वर्गात मोडतो हे पाहून प्रसाधनाची खरेदी करावी. म्हणजेच तेलकट त्वचेसाठी असणारी प्रसाधने सामन्य प्रकारच्या त्वचेसाठी चांगली असतीलच असे नाही.

प्रसाधन खरेदी करण्यापूर्वी त्यामध्ये वापरलेले साहित्य वाचून घ्यावे. ते प्रसाधन बनविताना त्यामध्ये वापरलेल्या काही वस्तू आपल्या माहितीच्या असतील. ज्या वस्तूंबद्दल आपल्याला माहिती नसेल, त्यांच्याबद्दल इंटरनेटवर उपलब्ध असलेले साहित्य वापरून माहिती करून घेता येऊ शकते. त्या माहितीवरून कोणत्या वस्तूचे कशा प्रकारचे इफेक्ट्स त्वचेवर होऊ शकतात याचा अंदाज घेणे सोपे होईल. प्रसाधानावर असलेल्या ‘ बेस्ट बिफोर ‘ आणि एक्सपायरी डेट्स पाहून मगच प्रसाधनाची खरेदी करावी. एक्स्पायर झालेले प्रसाधन तुमच्या त्वचेसाठी किंवा केसांसाठी धोकेदायक ठरू शकते. प्रसाधन खरेदी करण्यापूर्वी त्याबद्दल प्रसिद्ध होणारे एक्स्पर्ट रिव्ह्यू वाचावेत आणि त्यानुसार ते प्रसाधन खरेदी कार्याचे किंवा नाही याचा निर्णय घ्यावा.

Leave a Comment