लेसोथो येथील खाणीमध्ये सापडला जगातील पाचवा सर्वात मोठा हिरा


लेसोथो नामक एका लहानशा स्वतंत्र राज्यामध्ये असलेल्या ‘लेत्सेंग’ नावाच्या हिऱ्याच्या खाणीमध्ये जगातील पाचवा मोठा हिरा नुकताच सापडला आहे. ९१० कॅरट चा हा हिरा अंदाजे ४० मिलियन डॉलर्स इतक्या किंमतीचा आहे. जवळ जवळ संपूर्णपणे ‘फ्लॉलेस’, म्हणजेच कोणत्याही प्रकारची त्रुटी नसलेला हा हिरा जगामध्ये सर्वात निखळ आणि शुध्द समजल्या जाणाऱ्या हिऱ्यांच्या पैकी एक आहे. जेम डायमंड्स या ब्रिटीश कंपनीच्या मालकीचा हा हिरा आहे.

लेसोथो मधील या खाणीमध्ये २००६ साली देखील ६०३ कॅरटचा हिरा सापडला होता. पण आता ९१० कॅरटच्या या हिऱ्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या हिऱ्याचा रंग ‘ डी ‘ आहे, याचाच अर्थ डायमंड कलर चार्ट वर याचे रेटिंग सर्वात वरच्या दर्जाचे आहे. या हिऱ्याचे वजन १८१ ग्राम आहे. म्हणजेच अंदाजे दोन गोल्फच्या चेंडूंइतके याचे वजन आहे. या हिऱ्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या नायट्रोजन किंवा बोरॉन अशुद्धी नाहीत, म्हणूनच हा हिरा अतिशय मौल्यवान समजला जात आहे.

या हिऱ्याचे भविष्यामध्ये काय होईल, तो कोणाच्या संग्रही असेल या बद्दल अजून कोणताही निर्णय झालेला नसला तरी ह्या हिऱ्याची विक्री केली जाणार आहे हे मात्र निश्चित. २००६ साली लेसोथोच्या खाणीमध्ये सापडलेला हिरा १४.६ मिलियन डॉलर्स ला विकला गेला होता. तर २०१७ साली सापडलेला ‘ लेसेडी ड रोना ‘ हा हिरा तब्बल २५ मिलियन डॉलर्सला विकला गेला असल्याचे समजते.

जगातील सर्वात मोठा हिरा हा ‘ कलिनन ‘नामक हिरा असून, हा ३,१०६ कॅरटचा हिरा दक्षिण आफ्रिकेतील प्रेटोरीया येथे सापडला होता. तब्बल ६२१. ३५ ग्राम वजनाचा हा हिरा ब्रिटनच्या सातव्या एडवर्ड या राजाला त्याच्या जन्मदिनीची भेट म्हणून देण्यात आला होता. ह्या हिऱ्यामधून पुढे अनेक लहान मोठे असे मिळून शंभर हिरे तयार करण्यात येऊन, शाही परिवारातील सदस्य वापरत असलेली अनेक आभूषणे या हिऱ्यांनी बनविली गेली आहेत.

Leave a Comment