दररोज एक ग्लास ताक पिऊन आजाराला ठेवा लांब


आता हवामान बदलत आहे. उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अश्या वेळी आपल्या आहारामध्ये द्रव पदार्थांचा समावेश करणे महत्वाचे आहे, जेणेकरून शरीरामध्ये पाण्याची मात्रा नियंत्रित राहील. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अनेक सरबते, कैरीचे पन्हे, यांच्या जोडीने दररोज एल ग्लास ताकाचे सेवन केल्याने त्याचा फायदा आरोग्यास होतो. ताकाच्या नियमित सेवनाने शरीरातील अनेक लहान सहान व्याधी दूर होण्यास मदत होते.

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये किंवा आहारामध्ये अतिशय मसालेदार, तेलकट पदार्थांचा समावेश असल्याने शरीरातील उष्णता वाढते. त्यामुळे तोंड येणे, तळहात किंवा तळपाय सतत गरम असणे, त्वचा लालसर दिसणे अश्या तक्रारी उद्भवत राहतात. अश्या वेळी आपल्या आहारामध्ये दररोज एक ग्लास ताकाचा समावेश करावा. ताकाच्या सेवनाने शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते.

ताक प्रकृतीने थंड असल्याने अॅसिडीटी झाल्याने छातीत होणारी जळजळ, ताकाच्या सेवनाने कमी होते. ज्यांना वारंवार पित्त होते, त्यांनी आपल्या आहारामध्ये ताक्चे नियमित समावेश करावा. तसेच ताकामध्ये लॅक्टिक अॅसिड आणि ड जीवनसत्व मोठ्या प्रमाणावर असते. या दोन्ही तत्वांमुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती चांगली राहते. दह्यामध्ये असलेले जीवाणू अन्नाच्या पचनासाठी सहाय्यक आहेत. त्यामुळे दही किंवा ताकाच्या नियमित सेवनाने अन्नाचे पचन व्यवस्थित होण्यास मदत मिळते.