विड्याच्या पानांचे असेही फायदे


प्रत्येक लग्नसमारंभात, किंवा घरगुती मेजवानीमधील भोजन पार पडले, की त्यानंतर विडा असतोच. विड्याची पाने आणि त्यामध्ये असलेल्या इतर पदार्थांमुळे अन्नाचे पचन नीट होण्यास मदत होते. म्हणूनच जेवण झाल्यानंतर विडा खाण्याची परंपरा आपल्याकडे वर्षानुवर्षे चालत आली आहे. पण या शिवाय विड्याच्या पानाचे इतरही अनेक फायदे आहेत.

विड्याच्या पानांमध्ये अँटी इन्फ्लेमेटरी आणि अँटी बॅक्टेरियल प्रॉपर्टीज असल्याने याच्या वापराने चेहऱ्यावरील मुरुमे पुटकुळ्या दूर होण्यास मदत होते. यासाठी विड्याची काही पाने पाण्यामध्ये उकळून घेऊन हे पाणी थंड झाले की याचा वापर चेहरा धुण्यासाठी करावा. तसेच विड्याच्या पानाची पेस्ट थोडी हळद घालून चेहऱ्यावर लावावी आणि पाच मिनिटांनी चेहरा धुवून टाकावा. विशेषतः बाहेरून उन्हातून आल्यानंतर या उपायाचा अवलंब करावा. त्याने कांती सुधारण्यास मदत होते.

जर काही कारणाने अंगाला खाज सुटत असेल, तरी विड्याच्या पानाच्या वापराने खाज कमी होऊ शकते. उन्हाळ्यामध्ये अनेकदा पाठीवर घामोळी येतात. त्यासाठी देखील विड्याच्या पानांचा उपयोग करता येईल. त्यासाठी विड्याची पाने गरम पाण्यामध्ये बुडवावीत. हे पाणी उकळायचे नाही, तर गरम करून घेऊन काही काळ विड्याची पाने त्यामध्ये बुडवून ठेवावीत. गरम पाण्यामध्ये पाने घातल्यानंतर ती लगेच कोमेजतात. त्यानंतर लगेचच पाणी आचेवरून बाजूला करावे. हे पाणी थंड करून घेऊन आंघोळीच्या पाण्यामध्ये मिसळावे, व या पाण्याने आंघोळ करावी.

विड्याच्या पानाचा रस आंघोळीच्या पाण्यामध्ये घालून त्याने आंघोळ केल्यास घामामुळे किंवा अन्य काही कारणाने शरीराला येत असलेली दुर्गंधी निघून जाण्यास मदत होते. तसेच विड्याची पाने पिण्याच्या पाण्यामध्ये उकळून घेऊन हे पाणी प्यायल्याने शरीरातील टॉक्झिन्स बाहेर टाकली जाण्यास मदत होते. जर शरीरावर मस किंवा चामखीळ असतील तर त्यावर विड्याची पान वाटून ती पेस्ट लावावी. काही दिवस ही पेस्ट लावत राहिल्याने मस किंवा चामखीळ सुकून जाऊन नाहीसे होतील.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment