जगातील सर्वात मोठ्या आणि अद्भुत गुहेची सफर


व्हिएतनाम येथील हांग सान दोंग या नावाची गुहा जगातील सर्वात मोठी आणि अद्भुत गुहा ठरली आहे. या गुहेची लांबी ९ किमी, उंची १५० मीटर आणि रुंदी २०० मीटर आहे.या गुहेत एक वेगळेच जग असून येथेही नद्या, डोंगर, ढग, छोटी जंगले सर्व काही आहे. २०१३ मध्ये हि गुहा प्रथमच पर्यटकांना खुली करण्यात आली. दरवर्षी येथे २५० ते ३०० पर्यटकांना प्रवेश दिला जात होता. यंदा प्रथमच येथे ९०० पर्यटकांना प्रवेश दिला जाणार आहे.


ही अद्भुत नागरी फांग न्हा के बंग या राष्ट्रीय उद्यानाचा एक भाग आहे. ती ग्रेट वॉल म्हणूनही ओळखली जाते. चुनखडीपसून ती तयार झालेली आहे. ही गुहा २० ते ५० लाख वर्षे जुनी असावी असा तज्ञ लोकांचा अंदाज आहे. स्थानिक युवक हॉ खान्ह याने १९९१ साली तिचा प्रथम शोध लावला यानंतर ब्रिटीश संशोधकांनी या गुहेचा दौरा केला. त्यांनीच प्रथम ही गुहा जगापुढे आणली.


या गुहेत सूर्यकिरणे येतात आणि प्रकाशाचा अद्भूत खेळ पाहायला मिळतो. येथे अंतर्गत नदी आहे. छोटे जंगल आहे. वाहणारे वारे आहेत आणि डोंगर टेकड्याही आहेत. या गुहेची सफर ऑगस्टपूर्वी करावी लागते कारण नंतर येथे नदीच्या पाण्याची पातळी वाढते.


या गुहेत यंदा ९०० पर्यटक जाणार असून ४ दिवस व तीन रात्री ते तेथे मुक्काम करतील. त्यासाठी १ लाख ९१ हजार रुपये खर्च आहे. तसेच या पर्यटकांना सहा महिन्याचे प्रशिक्षण घ्यावे लागणार आहे. त्यात १० किमी पायी चालणे. रॉक क्लायंबिंग, योग आणि फिटनेस टेस्टचा समावेश आहे.

Leave a Comment