ऑफिस सिंड्रोम म्हणजे काय?


दररोज तुम्ही सकाळी अगदी ताज्या दमाने ऑफिसला जायला निघता. ऑफिसला जाण्याची वेळ निश्चित असल्याने घरातील सर्व कामे आटोपून तुम्ही ऑफिसला जाता. पण जाण्याची वेळ निश्चित असली तरी घरी परतण्याची वेळ निश्चित असेलच असे नाही. जसजसा कामाचा ताण वाढत जातो, तसतशी आठ तासांची नोकरी बारा-चौदा तासांची कधी होऊन जाते, कळतही नाही. आणि मग फाइल्स च्या ढिगाऱ्यातून, डेडलाईन्स पुऱ्या करता करता वेळेचे भान राहिनासे होते. कधी कधी कामाचा तणाव इतका वाढतो, की मेंदू आणि मन दोन्ही काम करीनासे होते. शरीराचा थकवा देखील वाढत जातो. घाई गडबडीमध्ये कामे उरकावीत, तर घोटाळे होण्याचा संभव अधिक, त्यामुळे कामामध्ये लक्ष देण्यावाचून पर्याय नसतो. किती ही प्रयत्न केला तरी कामाचा व्याप आवरता येत नाही, आणि त्याशिवाय दुसरे काहीही सुचत नाही, अशी काहीशी तुमच्या मनाची अवस्था झाली असेल, तर तुम्ही ‘ ऑफिस सिंड्रोम ‘ ने ग्रस्त असू शकता.

सतत डेस्क जॉब करणाऱ्या व्यक्ती ऑफिस सिंड्रोमने ग्रस्त असण्याचा संभव जास्त असतो. ह्या व्यक्ती सलग काही तास, विना विश्रांती आपल्या डेस्कशी बसून कामे करित राहतात. तसेच काम करताना त्यांचे बसण्याचे पोश्चर, म्हणजेच खुर्चीवर बसण्याची पद्धत देखील काही वेळा चुकीची असते. यामुळे पाठच्या कण्यावर ताण येऊन पाठदुखी उद्भविण्याचा संभव असतो. त्याशिवाय ऑफिसमधील कामातील डेडलाईन्स आणि त्या वेळेवर पूर्ण करण्याचा दबाव या मुळे मानसिक ताण देखील असतोच. त्यामुळे त्या व्यक्तीच्या ही नकळत तिचा स्वभाव काहीसा चिडचिडा बनत जातो.

सतत ऑफिसमध्ये बसून काम केल्याने डोके दुखणे, पाठ, खांदे किंवा कंबरदुखी, पाय आणि मनगटे सुन्न होऊ लागणे, जास्त वेळ कॉम्प्युटरवर काम केल्याने डोळे खाजणे, कोरडे पडणे, त्यांतून सतत पाणी येणे, दृष्टीदोष निर्माण होणे, सतत एकाच जागी बसून राहिल्याने स्नायू आखडणे अश्या प्रकारच्या शारीरिक व्याधी उत्पन्न होऊ लागतात. ह्या सर्व तक्रारी दूर करण्यासाठी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. ऑफिस सिंड्रोम रोखण्यासाठी काही गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे.

जर तुम्ही सतत कॉम्प्युटरवर काम करिता असाल, तर कॉम्प्युटर स्क्रीन आणि तुमची दृष्टी साधारण एकाच पातळीवर असेल याची काळजी घ्या. तसेच आपण बसत असलेली खुर्ची फार उंच किंवा फार बुटकी असू नये. तुमच्या कॉम्प्युटर स्क्रीनचा डिस्प्ले अँगल पाच ते वीस अंशांचा असावा, आणि तुमच्यातील व तुमच्या कॉम्प्युटर स्क्रीन मधील अंतर साधारण अठरा ते वीस इंच असावे. जर हे अंतर योग्य नसेल, तर डोळ्यांच्या तक्रारी उद्भवू शकतात. तुमच्या डेस्कची उंची जितकी असेल, साधारण त्याच उंचीवर तुमच्या खुर्चीचे हात असायला हवेत. असे असले तरच कॉम्प्युटरचा की बोर्ड किंवा माऊस वापरताना तुमच्या हातांचे पोश्चर ठीक असेल. तसेच सतत बसून काम करण्याऐवजी अधून मधून उठून थोडेसे चालावे.

तुमची बसण्याची खुर्ची फार उंच असली, तर तुमचे पाय अधांतरी राहतील, आणि परिणामी पायांमध्ये रक्ताभिसरण व्यवस्थित होणार नाही. अश्या वेळी पायांवर सूज येऊ शकते. खुर्चीवर बसल्यानंतर पाय व्यवस्थित जमिनीवर टेकता येतील इतपत खुर्चीची उंची असावी. जर तुम्हाला सतत डोकदुखी किंवा कंबरदुखी सतावत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. नुकत्याच केल्या गेलेल्या एका रिसर्च मध्ये स्पष्ट करण्यात आले आहे, की चहू बाजूने काचेने बंद, एअर कंडीशन्ड खोलीमध्ये काम करणे आरामदायक वाटत असले, तरी कालंतराने त्याचे आरोग्यावर दुष्परिणाम होतात. अश्या ऑफिसेसमध्ये काम करणारे लोक ताजी हवा, ऊन यांच्यापासून वंचित राहतात. काम करणे आवश्यक आहे, व्यस्त रहाणे चांगले आहे, पण आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे लक्ष देणे देखील तितकेच आवश्यक आहे. त्यामुळे काम करता करता आपण ‘वर्कोहोलिक’ होणार नाही, याची काळजी आपणच घ्यायला हवी.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment