शरीरामध्ये आयोडीनची कमतरता कशी दूर कराल?


मनुष्याच्या शारीरिक विकासामध्ये आयोडीन हे तत्व महत्वाचे आहे. आईच्या गर्भामध्ये असल्यापासूनच बाळाला या तत्वाची गरज असते. आयोडीनची मात्रा शरीरामध्ये अपुरी असेल, तर त्यामुळे निरनिराळ्या व्याधी उत्पन्न होण्याचा धोका संभवतो. शरीरामध्ये आयोडीनची कमतरता असेल, तर थायरॉइड ग्रंथीच्या कार्यावर याचा परिणाम होतो. यामुळे हायपोथायरॉइडीझम ही व्याधी उद्भवू शकते. आपल्या शरीरातील आयोडीनची कमतरता आयोडाईझ्ड मीठ आपल्या आहारामध्ये समाविष्ट केल्याने दूर होऊ शकते. आयोडाईझ्ड मिठाशिवाय आणखी काही पदार्थांचा समावेश आपल्या आहारामध्ये केल्याने शरीरातील आयोडीनची कमतरता दूर होऊ शकते.

बटाटे हे आयोडीनचे उत्तम स्रोत आहेत. पण बटाटे तळून खाण्याऐवजी उकडून किंवा ओव्हनमध्ये भाजून खावेत. बटाटे खाण्यासाठी जर उकडले किंवा भाजले असतील, तर त्यांची साले काढून न टाकता, सालाच्या सहित बटाट्यांचे सेवन करणे उत्तम. सी फूड्स, म्हणजेच समुद्रातून मिळणाऱ्या सर्व खाद्य पदार्थांमध्ये आयोडीन मुबलक मात्रेमध्ये असते. मासे आणि समुद्री वनस्पतींमध्ये आयोडीन भरपूर आहे. केल्प नामक समुद्री वनस्पतीमध्ये आयोडीनची मात्रा सर्वाधिक असते. ह्या वनस्पतीचा वापर सूप, सॅलड आणि इतर भाज्यांमध्ये करता येऊ शकतो.

केळ्याच्या सेवनाने शरीरामध्ये त्वरित उर्जा किंवा ताकद निर्माण होते. केळ्यामध्ये पोटॅशियम मोठ्या प्रमाणात असते. त्याशिवाय केळ्यामध्ये आयोडीन देखील असते. एका मध्यम आकाराच्या केळ्यामध्ये तीन ग्राम आयोडीन असते. आपल्या शरीराला दररोज दोन ग्राम आयोडीनची आवश्यकता असते. त्यामुळे दररोज एका केळ्याच्या सेवनाने आपल्या शरीराची आयोडीनची गरज पूर्ण होऊ शकते. अंड्यांमध्ये अनेक पोषक तत्वे आहेत. अंड्यांमध्ये प्रथिने, जीवनसत्वे आणि त्यांच्या जोडीला आयोडीन देखील असते. एका अंड्यामध्ये साधारण चोवीस मायक्रोग्राम आयोडीन आहे. बीन्स किंवा फरसबी मध्ये देखील आयोडीन मुबलक मात्रेमध्ये असते. तसेच या भाजीमध्ये असलेले फायबर आपल्या पचनशक्तीकरिता पण चांगले आहे. अर्धा कप फरसबीच्या शेंगांमध्ये बत्तीस मायक्रोग्राम आयोडीन आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment