येथे बनणार जगातील सर्वात उंच लाकडी इमारत


जपान देशातील एक कंपनी, २०४१ साली येणाऱ्या आपल्या ३५० वर्धापनदिनानिमित्त जगातील सर्वात उंच लाकडी इमारत बनविण्याच्या तयारीला लागली आहे. या इमारतीला ‘डब्ल्यू ३५०’ असे नाव देण्यात आले असून ही इमारत सत्तर मजली असणार आहे. ह्या इमारतीच्या निर्माणामध्ये केवळ दहा टक्के स्टील वापरले जाणार असून बाकी नव्वद टक्के वापर लाकडाचा केला जाणार आहे. ह्या गगनचुंबी इमारतीमध्ये आठ हजार घरे असणार आहेत, तसेच प्रत्येक घराच्या बाल्कनीमध्ये एक लहानशी बाग देखील असणार आहे. जपान देशामध्ये वारंवार भूकंप येत असतात. ही गोष्ट लक्षात घेऊन या इमारतीसाठी लाकूड आणि स्टील वापरून बनविल्या गेलेल्या ‘ ब्रेस्ड ट्यूब स्ट्रक्चर ‘ चा वापर केला जाणार आहे.

या प्रकल्पासाठी तब्बल सहाशे बिलियन येन , म्हणजे सुमारे ३६,००० कोटी रुपये, इतका खर्च येणार आहे. पण २०४१ सालापर्यंत तंत्रज्ञानामध्ये नवनवीन विकास झाले असण्याची शक्यता असल्याने, नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून खर्चामध्ये कपात करता येणे शक्य असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. २०१० साली जपान मध्ये पारित केलेल्या नव्या कायद्यानुसार तीन मजल्यांपेक्षा जास्त उंचीच्या इमारतींमध्ये लाकडाचा वापर करणे बंधनकारक केले गेले आहे. पण लाकडाच्या इमारती बनविल्या जाण्याची ही पहिलीच वेळ नाही. जगामध्ये अनेक गगनचुंबी इमारतींचे निर्माण, लाकडाचा वापर करून केले गेले आहे. मिनियापोलीस मध्ये लाकडाने बनविली गेलेली अठरा मजली इमारत आहे. या इमारतीमध्ये अनेक कंपन्यांची कार्यालये आहेत. त्याचप्रमाणे वँकूव्हरमध्ये देखील ५३ मीटर उंचीची लाकडी इमारत बनविली गेली आहे. ह्या इमारतीमध्ये विद्यार्थ्यांसाठी निवासस्थाने आहेत.

इमारतींच्या निर्माणासाठी वापरले जाणारे स्टील आणि कॉन्क्रीट पर्यावरणासाठी हानिकारक समजले जाते. या तत्वांपासून अनुक्रमे आठ आणि पाच टक्के कार्बन उत्सर्जन होत असते. या उलट लाकडामधून कार्बन उत्सर्जित केला जात नाही. पण लाकडाच्या इमारती बनविताना सर्वात मोठे आव्हान असते, ते म्हणजे या इमारती अग्नी प्रतिरोधक बनविणे. त्यासाठी आजकाल क्रॉस लॅमिनेटेड टिंबरचा वापर करण्यात येत आहे. हे लाकूड स्टील प्रमाणेच अग्नी प्रतिरोधक असून, जास्त तापमानामुळे देखील या लाकडाला कोणत्याही प्रकारची हानी होत नाही.

Leave a Comment