डोळ्यांच्या समस्यांची कारणे – कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम आणि बदलते हवामान


कॉम्प्युटर, लॅप टॉप, टॅबलेट, मोबाईल फोन ही उपकरणे आजच्या यंत्रयुगामध्ये आपल्या सर्वांचीच ‘ जीवनरेखा ‘ , म्हणजेच लाईफ लाईन झाले आहेत. व्यक्ती कोणीही आणि कोणत्याही वयोगटातील असो, ह्या उपकरणांवर अवलंबून असतेच. अगदी दैनंदिन आयुष्यामधील कामांसाठी देखील या उपकरणांचा सर्रास वापर होताना पाहायला मिळतो. मग हा वापर कामानिमित्त असो, कोणाशी संभाषण करायचे आहे म्हणून असो, चित्रपट पाहायचा असले म्हणून असो, किंवा ऑनलाईन खरेदी करायची असेल म्हणून असो, या उपकरणांच्या वापराला पर्याय राहिलेला नाही. कॉम्प्युटर स्क्रीन आणि इतर उपकरणांच्या स्क्रीन्समुळे डोळ्यांवर येणारी चमक किंवा ‘ग्लेअर’ डोळ्यांसाठी त्रासदायक ठरू शकते. डोळ्यांना थकवा, अंधुक दृष्टी, डोकेदुखी, डोळ्यांचा कोरडेपणा, अश्या अनेक तक्रारी उद्भवू शकतात.

कॉम्प्युटर किंवा तत्सम उपकरणे वापरणाऱ्या सुमारे ऐंशी टक्के व्यक्तींना कमी अधिक प्रमाणामध्ये या त्रासांना सामोरे जावे लागते. त्याशिवाय डोळ्यांची जळजळ, डोळे सुजणे, डोळ्यांवर प्रकाश सहन न होणे, अश्याही तक्रारी उद्भवू लागतात. म्हणूनच या विकारांना कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम असे म्हटले जाते. कॉम्प्युटर स्क्रीनच्या अगदी जवळ बसून काम करणे, किंवा मोबाईल फोन, टॅबलेटचा स्क्रीन डोळ्यांच्या अगदी जवळ धरल्याने हा सिंड्रोम उद्भवतो.

बदलत्या हवामानाचे परिणाम काही अंशी डोळ्यांवरही होत असतात. आता थंडीचे दिवस सरून हवेमध्ये उष्मा जाणवू लागला आहे. वाढत्या गरमीबरोबर डोळे कोरडे पडणे, लाल होणे, डोळे जळणे, अश्या तक्रारी उद्भवू शकतात. हवेमध्ये असणारे प्रदूषण, धूळ आणि कोरडेपणा यामुळे ह्या तक्रारी उद्भवितात. हवेमध्ये असलेली धूळ, प्रदूषण आणि उष्मा आपल्या संवेदनशील डोळ्यांना सहन होऊ शकत नाहीत. या तत्वांची अॅलर्जी असल्याने देखील हे दोष उद्भवू शकतात. ह्या तक्रारी दूर करण्यासाठी घरच्या घरी उपाय न करता तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. डोळ्यांमध्ये घालण्यासाठी ड्रॉप्स, आय वॉशेस यांचा वापर केल्याने या तक्रारी काही अंशी कमी होऊ शकतात.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment