जगातील सर्वात मोठा तंत्रविद्येचा बाजार…!


आजवर आपण अनेक गोष्टींचे बाजार भरताना पहिले असेल. भाजी, फळांचे बाजार, कपड्यांचे बाजार, गाड्या विकण्याचे, खरेदी करण्याचे बाजार, जनावरे खरेदी विक्रीचे बाजार, असे अनेक बाजार भरताना आपण नेहमी पहात असतो. पण जर एखाद्या बाजारामध्ये तंत्रविद्या, जादू टोण्यासाठी आवश्यक साहित्य मिळते असे जर तुम्हाला सांगितले, तर तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. मेक्सिको सिटी येथे तंत्रविद्येशी निगडीत सर्व साहित्य मिळू शकणारा, जगातील सर्वात मोठा बाजार आहे.

या बाजारामध्ये पहिल्या प्रथम येणाऱ्याच्या अंगावर भीतीने शहारा आल्याशिवाय राहत नाही, अशी या बाजाराची ख्याती आहे. हा बाजार जगातील सर्वात अजब बाजार म्हणून प्रसिद्ध आहे. जगतील एकमेव, तांत्रिक विद्येशी निगडीत असणाऱ्या या बाजारामध्ये जादूटोणा, मंत्र तंत्र करण्यासाठी सारे साहित्य उपलब्ध आहे. १९५० साली स्थापन झालेल्या या बाजाराचे नाव ‘ सोनोरा मार्केट ‘ आहे. या बाजारामध्ये जादूटोण्याच्या सर्व सामानाच्या व्यतिरिक्त हर तऱ्हेची हर्बल औषधी देखील उपलब्ध आहेत. हर्बल मेडिसिन्सच्या प्रत्येक दुकानामध्ये इथे एक डॉक्टरदेखील असतो. पण या डॉक्टरमंडळींना हर्बल मेडिसिन इतकेच जादू टोण्याचे देखील ज्ञान असते. समस्या कुठलीही असो, प्रत्येक समस्येवर तोड आणि रामबाण औषध असल्याचा दावा ही डॉक्टर मंडळी करतात.

या बाजारामध्ये तंत्राविद्येसाठी आवश्यक हर तऱ्हेचे सामान उपलब्ध आहे. यापैकी पुष्कळ वस्तूंची विक्री आणि खरेदी अवैध असली, तरी या सामानाची खरेदी विक्री इथे राजरोसपणे होत असते. या वस्तूंमध्ये जनावरांची कातडी, नखे आणि दात अश्या प्रकारच्या वस्तूंचा देखील समावेश आहे. येथे हमिंग बर्ड नामक पक्षाची विक्री सर्वाधिक होत असते. हा बाजार ‘सोनोरा विचक्राफ्ट मार्केट’ या नावाने देखील प्रसिद्ध आहे.

Leave a Comment