लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये मुरबाडमधील आजीबाईंच्या शाळेची नोंद


मुरबाडजवळील नाणेघाटाच्या पायथ्याशी असलेल्या फांगणे गावातील ग्रामस्थांनी गावातील साठीनंतरच्या पिढीला शिक्षित करण्याचा संकल्प केला असून राष्ट्रीयच नाही तर आंतराष्ट्रीय पातळीवरदेखील दोन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या या प्रयत्नांची दखल घेतली गेली. या शाळेबद्दल अनेकांना कुतूहल निर्माण झाले तर ग्रामस्थांच्या प्रयत्नांचे काहींनी कौतुक देखील केले. आता लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये ६० हून अधिक वय असलेल्या या आजीबाईंच्या शाळेची नोंद झाली आहे.

काही कारणांमुळे गावातील जुनी पीढी ज्यांचे शिक्षण अपूर्ण राहिले अशा पिढीला सुशिक्षित करण्याच्या संकल्पनेतून ही शाळा सुरू झाली. गेल्या काही काळापासून या गावात शिक्षण आणि स्वच्छतेचे आदर्श उपक्रम सुरू असून कै. मोतीराम गणपतदादा चॅरिटेबल ट्रस्ट आणि जिल्हा परिषद शाळा फांगणे यांच्या प्रयत्नाने गावातील ज्येष्ठ नागरिकांना किमान अक्षर ओळख आणि आकडेमोड करता यावी, याहेतूने ही शाळा सुरू झाली. या उपक्रमाला गावातील ज्येष्ठ महिलांनी चांगला प्रतिसाद दिला.

आजीबाई हातात दप्तर, पाटी, पुस्तक घेऊन रोज नवीन काही शिकायला मिळेल या उद्देशाने शाळेत येतात. सुरुवातीला या शाळेत २८ आजीबाई शिक्षणासाठी येत. ही शाळा दररोज दुपारी २ ते ४ या वेळेत भरते. किमान ६० ते ९० या दरम्यान या शाळेतील विद्यार्थ्यांचे वय आहे. आता लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये या शाळेची नोंद झाल्याने या शाळेची दखल आंतराष्ट्रीय पातळीवरदेखील अनेकजण घेत आहेत.

Leave a Comment