एसबीआय गुपचूप कापत आहे 990 रुपये, शेतकऱ्यांना हजारो कोटींचा फटका


स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी बँक आपल्या ग्राहकांना गुपचूप चुना लावत असल्याचा आणखी एक प्रकार समोर आला आहे. अशा प्रकारे बँकेने शेतकऱ्यांना हजारो कोटी रुपयांचा फटका लावला असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

हवामानाची स्थिती व अंदाज व्यक्त करण्याच्या नावाखाली एसबीआयच्या वतीने शेतकऱ्यांच्या खात्यातून 990 रुपये कापत आहे, असे वृत्त मध्‍य प्रदेशातील ‘नई दुनिया’ या वृत्तपत्राने दिले आहे. गंमत म्हणजे केंद्र सरकारने शेतकऱ्यांना अगोदरच टोल फ्री नंबरवरून हवामानाची माहिती मोफत देण्याची सुविधा उपलब्‍ध करून दिली आहे. तसेच कमी शिल्लक असल्याच्या नावाखाली खातेदारांकडून मोठ्या प्रमाणात रक्कम वसूल केल्याबद्दल एसबीआयवर याआधी प्रचंड टीका झाली होती.

मध्य प्रदेशातील विदिशा जिल्ह्यातील हजारीलाल शर्मा नावाच्या शेतकऱ्याची कथा या वृत्तपत्राने छापली आहे. हवामान वृत्त अलर्टच्या नावावर त्यांच्या खात्यातून 990 रुपये कापल्याचा संदेश शर्मा यांना आला होता. शर्मा यांनी बँक व्यवस्थापनाकडे तक्रार केली, परंतु त्यांचे पैसे परत देण्यात आले नाहीत.

विदिशातील सटेरन येथील एसबीआयच्या शाखा व्यवस्थापक बी. एस. बघेल यांनी माहिती न देता शेतकऱ्यांच्या खात्यातून पैसे कापल्याची कबुली दिली, असेही या वृत्तात म्हटले आहे. मात्र ही रक्कम मुंबई येथील मुख्य शाखेतून कापली जात असल्याचा दावा त्यांनी केला.

स्टेट बँकेने हवामान अलर्टची सुविधा देण्यासाठी आरएमएल नावाच्या कंपनीशी करार केला आहे. देशातील 16 राज्यांतील 500 एसबीआय शाखांतील ग्राहकांसाठी ही सुविधा उपलब्‍ध आहे.

Leave a Comment