पत्नीवरील प्रेमाखातर त्याने बांधले ‘प्रेमाचे मंदिर’, १२ वर्षापासून करत आहे पत्नीची पूजा


छमाराजनगर – कर्नाटकातील राजूस्वामी उर्फ राजू या शेतकऱ्याने बांधलेले प्रेममंदिर सध्या चर्चेचा विषय बनला असून बांधलेल्या मंदिरात राजूस्वामी यांनी भगवान शंकर व अन्य देवतांसोबत त्यांच्या पत्नीलाही जागा दिली आहे. पत्नीची राजू यांनी मुर्ती तयार केली असून गेली १२ वर्षे ते दररोज पत्नीची पूजा करत आहेत. सध्या सगळीकडेच राजूस्वामी यांनी बांधलेल्या या प्रेममंदिराची चर्चा होत असून कृष्णापूरामध्ये आजूबाजूच्या गावातील लोकही येऊन मंदिराबद्दल विचारत आहेत. या संदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे.

२००६मध्ये हे मंदिर राजूस्वामी यांनी बांधले असून ते गेली १२ वर्ष मंदिरात पत्नीची पूजा करत आहेत. राजूस्वामी यांच्या पत्नीचे नाव राजम्मा असे असून त्यांनी मंदिरामध्ये शनिश्वर, सिद्धप्पाजी, नवग्रव, शंकर या देवांच्या मुर्तींबरोबर पत्नीच्या मुर्तीची स्थापना केली आहे.

येलंदूर तालुक्यातील कृष्णपुरा गावात राहणाऱ्या राजू यांची तीन एकर शेती असून बहिणीच्या मुलीशीच राजू यांनी लग्न केले. लग्नाला आई-वडिलांचा विरोध होता पण काही काळाने त्यांचा विरोधही मावळला. विशेष म्हणजे राजू यांच्या लग्नाला बहीण व तिच्या नवऱ्यानेही विरोध केला नाही. पत्नी राजम्माने लग्नानंतर राजू यांना स्वतःचे मंदिर असावे, अशी इच्छा बोलून दाखविली होती. पण राजम्मा यांचे मंदिर बांधण्यापूर्वीच निधन झाले. राजू यांनी मग मंदिराची उभारणी करत त्यात इतर देवांबरोबर राजम्मा यांना स्थान देण्याचा निर्णय घेतला. मंदिरात देवांच्या मुर्तीबरोबर पत्नीच्या मुर्तीला स्थान दिल्याने अनेक लोकांनी सुरूवातीला त्याला विरोध केला व राजू यांनी लोकांच्या विरोधाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले.

आपल्या मृत्यूची पूर्वकल्पना राजम्माला आली असवी. तिच्याकडे विशेष शक्तीच होती. ती नेहमी फक्त मंदिराचा विचार करायची, असे राजू स्वामी यांनी सांगितले. मी पत्नीच्या याच इच्छाशक्तीमुळे मंदिर बांधायचा विचार केला. व आता त्या मंदिरात मी पत्नीच्या मुर्तीची पूजा करतो आहे, अशी भावना राजू यांनी व्यक्त केली.

Leave a Comment