किंतूर येथील स्वर्गीय पारिजात


संपूर्ण भारतात पारिजात किंवा प्राजक्त झाडे सर्वत्र आढळतात. उत्तरप्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यातील किंतूर या प्राचीन गावात असलेला पारिजताकाचा वृक्ष मात्र महाभारत कालापासुनचा आहे आणि यामुळे तो अनोखा आणि एकमेवही आहे. हा वृक्ष म्हणजे स्वर्गातल्या पारिजात वृक्षाचा वारस असल्याचा समज आहे. या गावाचे नाव पांडवांची आई कुंती हिच्यावरून पडले आहे. पांडवानी त्याच्या अज्ञातवासात येथे काही काळ मुक्काम केला होता.

पारिजाताचे झाड सर्वसाधारणपणे १० ते २५ फुट उंचीचे असते. किंतूर येथील झाड ४५ फुट उंच आणि त्याच्या खोडाची जाडी ५० फुट आहे. या दृष्टीनेही हे झाड वेगळे आहे. या झाडाला बिया येत नाहीत तसेच या झाडाची फांदी दुसरीकडे लावली तरी त्यापासून नवीन झाड येत नाही. जूनपासून हे झाड नाजूक सुगंधी पारिजात फुलांनी बहरून जाते. ही फुले पूजेत वापरली जातात मात्र त्यातही झाडाची फुले तोडून नाही तर खाली गळलेली फुले वेचून पूजेत वापरली जातात.


हरिवंशात या झाडाचा उल्लेख आहे. आपल्याला समुद्रमंथनातून पारिजात निघाला हे माहिती आहे. हे झाड इंद्राने स्वर्गात लावले होते. कृष्णाची पत्नी सत्यभामा हिला तिच्या दारात पारिजात हवा होता कारण कृष्णाने परिजाताची फुले रुक्मिणीला दिली होती. कृष्णाने इंद्राकडे पारिजात मागितला पण इंद्राने नकार दिल्याने युद्ध करून कृष्णाने पारिजात पृथ्वीवर आणला व सत्यभामेच्या अंगणात लावला हि कथा आपण ऐकलेली आहे. पांडव जेव्हा अज्ञातवासात वरील गावी आले तेव्हा माता कुन्तीसाठी त्यांनी येथे शिवलिंग स्थापन केले त्याला कुन्तेश्वर महादेव असे ओळखले जाते. या महादेवाची पूजा पारिजाताच्या फुलांनी करण्याची इच्छा कुंतीने बोलून दाखविल्यावर सत्यभामेच्या बागेतले झाड येथे आणून लावले गेले तेच हे झाड आहे असे सांगितले जाते.

सरकारने हा वृक्ष संरक्षित घोषित केला असून त्यावर टपाल खात्याने तिकीट जारी केलेले आहे. परिजाताची फुले, पाने, व साल आयुर्वेदिक औषधात वापरली जाते.

Leave a Comment