तुम्ही वापरत असलेल्या रंगांवर अवलंबून असते तुमची मनस्थिती


वकील काळा कोट का घालतात, किंवा डॉक्टरांचे एप्रन नेहमी पांढरे शुभ्र का असतात, या गोष्टींचा विचार आपण क्वचितच केला असेल. या बाबतीत विशेषज्ञांचे म्हणणे असे, की या निरनिराळ्या रंगांचे परिणाम आपल्या मेंदूवर होत असतात. त्याचप्रमाणे निरनिराळे रंग आपल्या ‘मूड’ ला किंवा मनस्थितीला प्रभावित करीत असतात. आपल्या आसपास असणाऱ्या सकारात्मक किंवा नकारात्मक उर्जेसाठी देखील रंग जबाबदार असतात. आपला आत्मविश्वास खालावणे किंवा वाढणे हे देखील काही अंशी रंगांवर अवलंबून असते.

आपण घालत असलेल्या कपड्यांच्या रंगांवरून आपला आत्मविश्वास दिसून येत असतो. त्या दृष्टीने लाल रंग आत्मविश्वास वाढविणारा आहे. काही महिलांच्या बाबतीत, लाल रंगाचा पोशाख परिधान केल्यानंतर त्यांना स्वतःबद्दल जास्त विश्वास वाटत असल्याचे दिसून आले. तर काही महिलांच्या बाबतीत केवळ लाल रंगाची लिपस्टिक लावल्याने देखील त्यांचा आत्मविश्वास दुणाविल्याचे पहावयास मिळाले.

काळा रंग हा अधिकार आणि बलाचे प्रतीक आहे. हा एक असा रंग आहे, जो शक्तीप्रदर्शनाकरिता योग्य समजला जातो. वकिलांचा कोट काळा असण्याचे हे देखील एक कारण आहे, त्यांची न्यायाच्या प्रति असलेली आस्था दर्शविण्यासाठी काळा रंगांचा कोट वकील परिधान करतात. काळ्या रंगाच्या पोषाखाच्या वापराने तुमच्या बॉडी लँग्वेज वर देखील सकारात्मक परिणाम दिसून येतो.

डोळ्यांना थंडावा देणारा रंग आहे पांढरा. ह्या रंगाने मन:शांती प्राप्त होते. मनावरील तणाव हलका होण्यास या रंगामुळे मदत मिळते. म्हणूनच आपल्याला बरे करणाऱ्या, आजारामध्ये धीर देणाऱ्या डॉक्टरांच्या एप्रनचा रंगदेखील पांढराच असतो. घरामध्ये पांढरा किंवा ऑफ व्हाईट रंगाचा वापर केल्यास घर स्वच्छ, प्रकाशमान दिसते, त्याचबरोबर घरातील खोल्या मोठ्या वाटतात.

निळा रंग कार्यक्षमता वाढविणारा आहे. म्हणूनच कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये, किंवा औपचारिक कार्यक्रमांसाठी बहुतेक वेळी निळ्या रंगाचे शर्टस किंवा इतर पोशाख वापरले जाताना दिसतात. मात्र या रंगाच्या अतिवापाराने मनस्थिती काहीशी उदासीन राहू शकते. त्यामुळे पूर्णपणे निळ्या रंगाचा पोशाख वापरण्याऐवजी इतर रंगांशी योग्य रंगसंगती करून हा रंग वापरावा. पिवळा रंग आपल्या मेंदूच्या कार्यशक्तीला आणि आपल्या शरीराच्या नर्व्हस सिस्टमला उत्तेजित करणारा समजला जातो. या रंगाच्या वापराने आपल्या मेंदूमध्ये सरोटोनि नामक रसायन तयार होते. हे रसायन मेंदूमध्ये तयार झाल्याने आपली मनस्थिती चांगली राहते. हिरव्या रंगाने एकाग्रता वाढण्यास मदत होते. तसेच या रंगाच्या वापरामुळे आपल्या मनावरील तणाव कमी होण्यास मदत मिळते.

Leave a Comment