मुलांना व्यस्त कसे ठेवाल?


साधारण तीन ते पाच वर्षांच्या वयाची मुले ही स्वतः चालू फिरू शकत असली, आणि आपले आपण खेळू शकत असली, तरी अश्या मुलावर सातत्याने लक्ष ठेवण्याची गरज असते. या मुलांना पुरेशी समज आलेली नसली, तरी प्रत्येक नवीन गोष्ट जाणून घेण्याचा उत्साह मात्र त्यांच्यामध्ये पुरेपूर असतो. दिवसभर त्यांच्या मागे फिरून त्यांच्या आई मात्र थकून जातात. मुलांना सातत्याने खेळामध्ये देखील विविधता लागते. दररोज एकाच प्रकारचा खेळ खेळून मुळे कंटाळून जातात. अश्या वेळी मुलांना नवनवीन अॅक्टीव्हीटीज मध्ये व्यस्त ठेवल्याने त्याचा वेळ चांगला जातो, ज्ञानवर्धन होते आणि मुलांचा कंटाळा देखील लांब पळतो.

आजकाल मुलांसाठी बाजारामध्ये निरनिराळ्या प्रकारची फ्लॅश कार्ड्स उपलब्ध असतात. या कार्ड्सवर एका वस्तूचे मोठे आणि रंगीत चित्र असते. हे कार्ड मुलांना दाखवून ती वस्तू ओळखण्यास सांगावी आणि त्या वस्तूचे काय काय उपयोग होऊ शकतात, हे मुलांना समजावून सांगावे. अशी अनेक तऱ्हेची फ्लॅश कार्ड्स बाजामध्ये उपलब्ध आहेत. ह्यावरील चित्रे मुलांच्या नजरेसमोरून अनेकदा गेल्याने वास्तविक आयुष्यामध्ये देखील ती वस्तू डोळ्यांसमोर आली, की मुलांना ती वस्तू पटकन ओळखता येते.

तऱ्हे-तऱ्हेच्या लाकडी किंवा प्लास्टिकपासून तयार केलेल्या ब्लॉक्सपासून चित्रे तयार करणे हे देखील मुलांना आवडते. या द्वारे मुलांना निरनिराळे प्राणी, पक्षी, वाहने यांची ओळख होते. अश्या ब्लॉक्सशी खेळल्याने मुलांची ‘मोटर स्किल्स’ विकसित होण्यास मदत होते. तसेच एक साधा बॉल देखील निरनिराळ्या पद्धतीने मुलांना खेळता येतो. मुलांना बॉल झेलायला, टाकायला, आणि त्याला फुटबॉलप्रमाणे किक मारायला देखील शिकवावे. याने मुलांना खेळण्याचा आनंद तर मिळेलच, शिवाय भरपूर शारीरिक व्यायाम देखील होईल.

मुलांना आपल्या घरातील बाल्कनी मध्ये किंवा खिडकी मध्ये बसवून बाहेर त्यांना काय काय गोष्टी दृष्टीस पडत आहेत, या बद्दल बोलण्यास सांगावे. असे करीत असताना मुलांना अनेक नवनव्या वस्तूंचा परिचय होईल. रस्त्यावरून येणारी-जाणारी वाहने, झाडांवर बसलेले, आकाशामध्ये उडणारे पक्षी मुलांना दाखवून ते ओळखण्यास शिकवावे. आजकाल बाजारामध्ये अनेक शैक्षणिक ऑडीयो, व्हीडीयो सीडी उपलब्ध आहेत. याद्वारे मुलांचे ज्ञानवर्धन करण्यास मदत मिळेल. मुलांना त्यांच्या आसपासच्या वस्तूंची माहिती देताना सोप्या, त्यांना लक्षात राहील अश्या पद्धतीने द्यावी. अश्या रीतीने मुलांचे मनोरंजन ही होईल आणि तुम्ही शिकविलेल्या गोष्टी त्यांच्या जास्त काळ लक्षात राहतील.

Leave a Comment