मधुमेह : कारणे आणि बचाव


मधुमेह या विकाराला अनेक मेटाबोलिक व्याधींचा एक समूह म्हणता येईल. ह्या विकारामध्ये व्यक्तीच्या रक्तातील ब्लड शुगर लेव्हल सामान्य पातळीपेक्षा अधिक असते. शरीरामध्ये इन्स्युलीनचे अपुरे निर्माण झाल्याने किंवा शरीरातील कोशिका इंस्युलीनला रीस्पॉन्ड करीत नसल्यास रक्तातील ब्लड शुगर लेव्हल वाढू लागते. ज्यांना हा विकार असेल, त्या व्यक्तींना पॉलीयुरिया, म्हणजेच वारंवार लघवीस जावे लागते. तसेच त्यांना पॉलीडीप्सिया, म्हणजेच सतत तहान लागणे, आणि पॉलीफेजीया, म्हणजे जास्त भूक लागणे, अश्या समयांना तोंड द्यावे लागते. मधुमेह, टाईप १ आणि टाईप २ असे दोन प्रकारचे असतात. टाईप १ या प्रकारच्या मधुमेहामध्ये शरीरामध्ये इन्स्युलीन तयार होणे बंद होते. साधारण दहा टक्के मधुमेहींमध्ये टाईप १ ह्या प्रकारचा मधुमेह आढळून येतो. टाईप २ या प्रकारच्या मधुमेहामध्ये शरीरामध्ये इन्स्युलीन अपर्याप्त मात्रेमध्ये तयार होत असते. बहुतेक मधुमेहींमध्ये या प्रकारचा मधुमेह पाहायला मिळतो. तिसऱ्या प्रकारचा मधुमेह म्हणजे ‘ जेस्टेशनल डायबेटिस ‘. हा मधुमेह महिलांमध्ये गर्भावस्थेच्या दरम्यान उद्भवतो.

नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि वजनावर नियंत्रण ठेवल्याने मधुमेहावर नियंत्रण ठेवता येणे शक्य आहे. जर मधुमेहावर नियंत्रण ठेवले गेले नाही, तर मधुमेही व्यक्तीला हृदय, लिव्हर, डोळे, इत्यादींसंबंधी विकारांचा सामना करावा लागू शकतो. मधुमेह हा प्रामुख्याने गतिहीन जीवनशैली, जंक फूड चे अतिसेवन, यामुळे उद्भवू शकतो. खानपानाच्या अनियमित आणि चुकीच्या सवयी यासाठी कारणीभूत असतात. एखाद्या व्यक्तीला अतिशय कमी शारीरिक हालचाल असेल, दिवसातील बहुतक वेळ व्यक्ती बसून काम करीत असेल, तर अश्यावेळी त्या व्यक्तीचे वजन वाढू लागण्याची शक्यता असते. वजन वाढू लागले की शरीरामध्ये इन्स्युलीन निर्माण होण्यामध्ये अडथळे येऊ लागतात. परिणामी मधुमेह उद्भवतो. काही परिवारांमध्ये मधुमेह अनुवांशिक असतो.

मधुमेहापासून बचाव करण्यासाठी नियमित व्यायाम आणि संतुलित आहार असणे अतिशय आवश्यक आहे. दररोज किमान चाळीस ते पंचेचाळीस मिनिटे आपला आवडीचा व्यायाम करावा. आहार संतुलित असावाच, पण त्याचबरोबर खानपानाच्या वेळेमध्ये नियमितता आणि वेळशीर खाणे हे देखील तितकेच आवश्यक आहे. आपल्या आहारामध्ये ताजी फळे, भाज्या, कडधान्ये, यांचा समावेश करावा, तसेच दोन भोजनांच्या मध्ये फार काळ अंतर असणार नाही याची काळजी घ्यावी. वजनावर नियंत्रण आणि पर्याप्त मात्रेमध्ये झोप ह्या दोन्ही गोष्टी मधुमेहापासून बचाव करण्यासाठी आवश्यक आहेत. मानसिक तणाव हाताबाहेर गेल्याने देखील मधुमेह उद्भविण्याची शक्यता असते. त्यामुळे निरनिराळ्या रीलॅक्सेशन टेक्निक्सचा अवलंब करावा. संगीत, वाचन, ध्यानधारणा यांच्या मदतीने मनावरील तणाव कमी करता येऊ शकतो.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment