‘इंटस्टेलर’ चित्रपटापेक्षाही कमी भारताच्या ‘चांद्रयान-२’ मोहीमेचा खर्च


नवी दिल्ली: भारतीय संशोधकांनी अगदी कमी खर्चात उपग्रहांचे प्रक्षेपण करणाऱ्या प्रक्षेपकांच्या निर्मितीनंतर आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला असून हॉलिवूडच्या ‘इंटस्टेलर’ या चित्रपटापेक्षाही कमी भारताच्या आगामी चांद्रयान-२ मोहीमेचा खर्च असल्याची बाब समोर आली आहे. १०६२ कोटींचा खर्च ‘इंटस्टेलर’ या चित्रपटाच्या निर्मितीसाठी आला होता. पण अवघ्या ८०० कोटींमध्ये भारताची चांद्रयान-२ मोहीम पार पडणार आहे. भारताची २०१३ मधील यापूर्वीची मंगळयान मोहीमही कमी खर्चामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेचा विषय ठरली होती. ४७० कोटी रूपये खर्च या मोहीमेसाठी झाला होता. त्यावेळी प्रदर्शित झालेल्या ‘ग्रॅव्हिटी’ या हॉलिवूडपटाचे बजेटही (६४४ कोटी) या मोहीमेपेक्षा जास्त होते.

इतक्या कमी खर्चात भारतीय अंतराळ अवकाश संस्थेने (इस्त्रो) मोहीम पार पाडल्याबद्दल आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे खूप कौतुकही झाले होते. ‘इस्त्रो’चे अध्यक्ष डॉ. के. सिवन यांनी याबद्दल खुलासा करताना सांगितले की, अत्यंत सोपी प्रक्रिया बनवणे, मोठ्या क्लिष्ट सिस्टीमला लहान आणि साधे बनवणे, क्वालिटी कंट्रोल आणि आऊटपूट वाढवणे यामुळे आपल्या मोहीमा कमी खर्चातही यशस्वी होत आहेत. आम्ही अंतराळयान किंवा रॉकेट विकसित करण्याच्या प्रत्येक टप्प्यावर लक्ष ठेवतो, ज्यामुळे उत्पादनाची नासाडी थांबते आणि खर्च कमी होतो.

Leave a Comment