गुजरात विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाला यश मिळाले असले तरीही ते अपेक्षेप्रमाणे नव्हते. राहुल गांधी यांनी प्रचाराचा मोठा धुरळा उडवून देऊन भाजपाला जेरीस आणले होते. तेव्हापासून कॉंग्रेसच्या नेत्यांच्या अपेक्षा उंचावल्या आणि त्यांनी २०१९ साली केन्द्रात मित्र पक्षांच्या मदतीने सत्तेवर येण्याची स्वप्नेही पहायला सुरूवात केली. राहुल गांधी आता सुधारले आहेत आणि ते आता देशाचे नेतृत्व करू शकतील अशीही चर्चा सुरू करून देण्यात आली. यानंतर राजस्थानात भाजपाच्या तीन जागा कॉंग्रेसने पोट निवडणुकीत हिसकावून घेतल्या. त्यामुळे तर कॉंग्रेसच्या आशेला चांगलीज पावली फुटली होती पण ज्या गुजरातेतून हा सारा आशेचा प्रवाह सुरू झाला त्या गुजरातेत आता भाजपाचे मनोधैर्य वाढवणारे निकाल हाती आले आहेत.
गुजरातेत पुन्हा भगवा
एकूण ७५ नगर पालिकांच्या निवडणुका झाल्या. त्यातील ४७ नगरपालिकांत भाजपाने निर्विवाद बहुमत मिळवले आहे. हा विजय भाजपाच्या मनोधैर्यात वाढ करणारा आहे खरा पण गेल्या निवडणुकीत म्हणजे २०१३ साली या ७४ पैकी ५९ नगरपालिकांत भाजपाने बहुमत मिळवले होते. तेव्हा गेल्या वेळी भाजपाच्या हातात असलेल्या १२ नगर पालिका भाजपाने गमावल्या आहेत मात्र ४७ ठिकाणी भाजपाला मिळाले आहे. भाजपाच्या १२ गमावलेल्या नगरपालिका जर कॉंग्रेसने जिंकल्या असत्या तर भाजपाच्या या पिछेहाटीत कॉंग्रेसने काही तरी कमावले असे म्हणता आले असते पण कॉंग्रेसला या निवडणुकीत फार काही चांगले यश मिळवता आलेले नाही.
२०१३ साली कॉंग्रेसला १३ ठिकाणी बहुमत मिळाले होते. मात्र आता त्यात तीनची भर पडून कॉंग्रेसच्या नगर पालिकांची संख्या १६ झाली आहे. फार तर असे म्हणता येईल की कॉंग्रेसच्या नगर पालिका वाढल्या आहेत आणि भाजपाच्या कमी झाल्या आहेत. असे होऊनही भाजपाच्या हातात असलेल्या नगरपालिकांची संख्या कॉंग्रेसपेक्षा तिप्पट आहे. भाजपाच्या हातातल्या गमावलेल्या १२ जागा कॉंग्रेसच्या हातात पडल्या असत्या तरीही कॉंग्रेसला आनंद व्यक्त करता आला असता पण भाजपाच्या गमावलेल्या सहा नगरपालिका आता त्रिशंकू झाल्या असून चार नगर पालिकांत अपक्षांना बहुमत मिळाले आहे. इतरही लहान पक्षांनी एक दोन जागांवर बहुमत मिळवले आहे. एकुणात कॉंग्रेसच्या गोटात गेल्या काही दिवसांपासून आशेचे फुगे फुगायला सुरूवात झाली होती त्या फुग्यातली हवा या निकालाने नक्कीच काढली आहे.