आसुसने सादर केला विवोबुक एस १४ लॅपटॉप


भारतीय ग्राहकांसाठी नॅनोएज या प्रकारातील डिस्प्लेने सज्ज असणारा विवोबुक एस १४ हा लॅपटॉप आसुस कंपनीने तीन व्हेरियंटमध्ये सादर केला आहे.

डिस्प्ले हा कोणत्याही लॅपटॉपमध्ये सर्वात महत्वाचा घटक असल्यामुळे, अन्य कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी उत्तमोत्तम डिस्प्लेयुक्त मॉडेल्सवर भर देत आहेत. नॅनोएज या प्रकारातील स्क्रीन आसुसच्या विवोबुक एस १४ या मॉडेलमध्ये दिलेला आहे. १४ इंच आकारमानाचा हा डिस्प्ले असून फुल एचडी क्षमतेचा आहे. टचपॅडसह ब्लॅकलीट या प्रकारातील किबोर्ड यात प्रदान करण्यात आला आहे. हा लॅपटॉप गोल्ड आणि ग्रे या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे.

लॅपटॉप सातव्या पिढीतील कोअर आय३, आठव्या पिढीतील कोअर आय५ आणि आठव्या पिढीतील कोअर आय७ या तीन प्रोसेसरने युक्त असणार्‍या तीन व्हेरियंटमध्ये विवोबुक एस १४ हे ग्राहकांना उपलब्ध करण्यात आले आहे. या तिन्ही व्हेरियंटची रॅम ३ जीबी असून २५६ जीबीपर्यंत एसएसडी तर १ टेराबाईटपर्यंत एचडीडी या प्रकारातील स्टोअरेजचे पर्याय देण्यात आले आहेत. यात तीन लिथियम आयन सेलयुक्त बॅटरी देण्यात आली असून ती एकदा चार्ज केल्यानंतर आठ तासांचा बॅकअप देत असल्याचा कंपनीचा दावा आहे. तसेच ही बॅटरी अवघ्या ४९ मिनिटांमध्ये तब्बल ६० टक्के चार्ज होत असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

Leave a Comment