समय बडा बलवान


सोलापूर आणि लगतच्या जिल्ह्यांत सध्या माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांचे एक छायाचित्र मोठ्या चर्चेचा विषय झाले आहे. या छायाचित्रात ते केन्द्रीय मंत्री नितीन गडकरी यांना हार घालत आहेत आणि त्यांच्या पाया पडताना दिसत आहेत. कोणीतरी ते छायाचित्र आपल्या स्मार्टफोनने टिपले आणि ते तासाभरात व्हायरल झाले. त्या दिवशी गडकरी आणि मुख्यमंत्री असे दोघेही सोलापुरात होते. ढोबळे यांनी या दोघांनाही हार घातले. मुख्यमंत्र्यांनी हार घातल्यानंतर ढोबळे यांच्याकडे जो दृष्टीक्षेप टाकला तो विशेष होताच पण गडकरी यांच्या पाया पडणारे ढोबळे सर्वांना अनेक घटनांची आठवण देऊन गेले. कारण ढोबळे यांना भाजपात येण्याची इच्छा आहेे.

त्यांची इच्छा काहीही असली तरीही भाजपाचे नेते त्यांना आत घेण्यास राजी नाहीत. तसा भाजपाने महाराष्ट्रात आपला विस्तार करताना राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांना भाजपात दाखल करून घेतले आहे आणि त्यांना पावन करून घेतले आहे. अनेक राष्ट्रवादी नेते भाजपात आले पण ढोबळे यांना मात्र ताटकळत बसावे लागले आहे. कारण त्यांच्या भाजपा प्रवेशाला भाजपाच्याच अनेक कार्यकर्त्यांचा सक्त विरोध आहे. मुळात ढोबळे यांचा स्वत:चा असा काही जनाधार नाही. ते प्राध्यापक आहेत आणि शरद पवार यांची त्यांच्यावर मर्जी आहे म्हणून त्यांना राखीव जागेवर तिकिट दिले जाते आणि पवारांच्या प्रभावाखाली ते निवडूनही येतात. आता सारे वारे फिरले असल्याने ढोबळे यांना भाजपात येण्याचे वेध लागले आहेत. त्यांच्या अनेक शिक्षण संस्था आहेत आणि त्या संस्था चालवणे हे राजाश्रया शिवाय शक्य नाही याची त्यांना जाणीव आहे.

भाजपापेक्षाही अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना प्रवेश देण्यास खास करून विरोध सुरू केला आहे. ढोबळे यांनी गतवर्षी सोलापुरातल्या आपल्या शिक्षण संस्थेत कबीर जथ्थ्याचा संगीताचा कार्यक्रम ठेवला होता. या जथ्थ्यातल्या काही कलाकारावर नक्षलवादी असल्याचा आरोप असल्यामुळे या कार्यक्रमात विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. ढोबळे यांनी भाडोत्री गुंडांना आणून या कार्यकर्त्यांना मारले. या माराचा राग वि.प. कार्यकर्त्यांच्या मनात आहे. अशा रितीने नक्षलवाद्यांची बाजू घेऊन आपण ज्या कार्यकत्यार्ंंना मारहाण करतो त्याच विचाराच्या पक्षात जाण्यासाठी आपण एवढे लाचार होतो याची ढोबळे यांना काही म्हणजे काही वाटत नाही. म्हणून शेवटी पाया पडून का होईना पण भाजपात घुसावे असा ढोबळे यांचा प्रयास आहे.