फ्रीजचा असाही करता येईल वापर


अद्ययावत यंत्रयुगातील, रेफ्रिजरेटर किंवा फ्रीज हे एक अतिशय कमालीचे यंत्र आहे असे म्हणायला हवे. भाज्या, फळे, दुध आणि दुग्धजन्य पदार्थ जास्त काळ ताजे ठेवणारे हे यंत्र जवळजवळ प्रत्येक घराचा भाग झाले आहे. पण अन्नपदार्थ जास्त काळ ताजे ठेवण्याव्यतिरिक्त देखील हे यंत्र इतर अनेक गोष्टींसाठी आपल्या कामी येऊ शकते. या गोष्टींबद्दल जाणून घेऊ या.

एका उत्तम प्रतीची जीन्स फार जास्त वेळा धुतल्याने खराब होण्याची शक्यता असते. अश्यावेळी जीन्सला कोणत्याही प्रकारचे दुर्गंध येत असल्यास जीन्स प्लास्टिकच्या पिशवीमध्ये बांधून फ्रीजर मध्ये ठेवावी. दोन तास फ्रीजर मध्ये जीन्स ठेवल्याने जीन्स पुन्हा फ्रेश आणि दुर्गंधी विरहित होते.

जर एखादे वेळी चुकून कपड्यांना च्युईंग गम चिकटले असेल, तर तो कपडा फ्रीझरमध्ये ठेवावा. असे केल्याने च्युईंग गम कडक होईल आणि कपड्यावरून सहज ओढून काढता येईल.

फुलांचा बुके तयार करण्याआधी फुलांची जास्तीची देठे काढून टाकून फुले काही काळ फ्रीजमध्ये ठेऊन द्यावीत. फ्रिजच्या थंड हवेने फुले ताजी तवानी राहतील.

ऑक्सिडेशनच्या प्रक्रियेमुळे लिपस्टिक्समधील ऑईल कंटेंट कमी होऊन लिपस्टिक्स खराब होण्याची शक्यता असते. जास्त उष्ण तापमानामुळे लिपस्टिक्सवर बुडबुडे येतात. अश्या वेळी लिपस्टिक्स फ्रीजमध्ये साठवून ठेवल्याने जास्त काळ चांगल्या राहतात. त्याचप्रमाणे नेल पॉलिश देखील फ्रीजमध्ये ठेवल्याने जास्त काळ चांगले राहते.

जर पत्राचे पाकीट चिकटविले गेले आणि त्यानंतर त्यामध्ये अजून काही घालायचे राहून गेले आहे असे लक्षात आल्यास चिकटविलेले पाकीट उघडणे कठीण होऊन बसते. अश्यावेळी चिकटविलेले पाकीट थोडा वेळ फ्रीझर मध्ये ठेवावे. त्यानंतर पाकीट सहज उघडेल.

एअर फ्रेशनर्स म्हणून इसेन्शियल ऑइल्स वापरली जातात. ही ऑईल्स फ्रीजमध्ये साठविल्याने पुष्कळ वेळ चांगली राहतात.

Leave a Comment